नवीन नांदेड। नवीन नांदेड भागातील पाणीपुरवठा, दिवाबत्ती, स्ट्रीट लाईट व रस्ते यासह मुलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित कामे चालू करण्यासाठी व वेळोवेळी निवेदन देऊन होत असलेले मनपा प्रशासनाने दुर्लक्ष व सातत्याने पाठपुरावा करून अखेर कर्तव्यदक्ष आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या मुळे अनेक कामे मार्गी लागण्यात यश आले आहे.


माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी नांदेड शहराचा विकास आराखडा तयार करून शेकडो कोटी रुपयांचा निधी नांदेड शहराच्या विकासासाठी आणला होता, मनपा प्रशासनाने टेंडर प्रक्रिया पूर्ण करून संबंधीत गुतेदार एजन्सी ला कार्यारंभ आदेश दिले होते. नेत्यांच्या हस्ते गाजावाजा करत उद्घाटनाचे नारळही फोडण्यात आले होते परंतु अधिकारी आणि गुतेदार मनमानी कारभारामुळे ही विकास कामे अद्याप पूर्ण झाली नाहीत परिणामी विकास आराखडा काग दावरच राहीला, माजी नगरसेविका सौ. वैजयंती गायकवाड यांनी माहे में २०२३ पासुन सातत्याने आयुक्तांकडे पत्रव्यवहार करून प्रलंबीत कामाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.


हे प्रलंबीत काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०२३ मध्ये १६ लाख ७३ हजार ७७९ रुपयाच्या अतिरिक्त कामाला मंजुरी देऊन मॅकवेल इन्फ्रास्ट्रक्चर नांदेड या एजन्सीला माहे जून २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याच्या अटीवर वर्क ऑर्डरही देण्यात आले होते ,परंतु या कामाकडे कुणीच फारसे गांभीर्याने बघीतले नाही. अखेर माजी नगरसेविका सौ. वैजयंती गायकवाड आणि त्यांचें प्रतीनिधी भि.ना. गायकवाड यांनी आयुक्तांचे कार्यालय गाठुन प्रलंबीत कामाचा तपशीलच मांडला होता. कर्तव्यदक्ष आयुक्त महेश डोईफोडे यांनी शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे आणि विद्युत विभागाचे उप अभियंता ढवळे यांना बोलावून झाडाझडती घेतली आणि संबंधीतांचे अक्षम्य दुर्लक्ष पाहुन तीव्र नाराजी सुध्दा व्यक्त केली होती.


नविन नांदेड शहराला प्रभावी क्षमतेने पाणीपुरवठा करता यावा म्हणून सन २०१६ मध्ये असदवन येथे S-4 / S-6 नावाचा अतिरिक्त जलकुंभ बांधण्यात आला आहे. नियोजीत जलकुंभा पासुन यशोधरानगर, आंबेडकरवादी मिशन परिसर, भास्करेनगर, क्यान्सर हॉस्पिटल,गोदावरी हातमाग सोसायटी,भिमवाडी पर्यंत अंतर्गत जल वाहीन्या टाकण्यात आल्या आहेत परंतु काम पूर्ण करुन कंत्राटदाराने पाणीपुरवठा करुन चाचणी दिली नाही. क्रॉस कनेक्शन जोडण्या केल्या नाहीत. त्यामुळे आज पर्यंत विकास आराखड्यातील योजनांचा मालमत्ता धारकांना लाभ मिळाला नाही.

सौ.गायकवाड यांनी पत्रव्यवहार केल्यानंतर अपुर्ण राहीलेले काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०२३ मधे अतिरिक्त निधीही मंजूर करण्यात आला होता. सदरचे कामही दिलेल्या मुदतीत पूर्ण झाले नसल्याचे निदर्शनास आले,त्यानंतर आयुक्तांनी शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना एक महीन्यात अपुर्ण राहीलेले काम पूर्ण करण्याच्या सुचना दिल्यानंतर अधिकारी व गुतेदार आळस झटकून कामाला लागले आहेत, माहे सप्टेंबर २०२४ मध्ये वस्ती वाढ झालेल्या नवीन नांदेड परिसरातील वरील वस्त्यांना पाणीपुरवठा केला जाईल असे सांगण्यात आले.
डॉ.आंबेडकर चौक सिडको ते रमामाता आंबेडकर चौक सिडको पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन १२० फुटी रुंदीच्या तीन पदरी सिमेंट रोडचे काम करण्यात आले आहे.सदरचे काम पूर्ण करण्यासाठी आंबेडकर चौक ते जुने वसंतराव नाईक कॉलेज पर्यंत असलेल्या स्ट्रीट लाईटचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता, तर नाईक कॉलेज ते रमामाता आंबेडकर चौक दरम्यान सिमेंट रोडच्या कामात अडथळा ठरणारे विजेचे पोल काढून गुतेदार आपल्या गोदामात नेउन टाकले होते त्यामुळे पथदिवे बंद आहेत,नगरसेविका सौ. वैजयंती गायकवाड यांनी म.न.पा. प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पथ दिवे चालु करण्या साठी लेखी पत्रव्यवहार केला होता.
दोन्हीही विभाग पथदिवे चालु करण्याची जबाबदारी एकमेकांवर टाकुन टोलवा टोलवी करत होते. विधुत विभागाचे उपअभियंता ढवळे यांनी पथदिव्याचे केबल नादुरुस्त झाल्यामुळे नवीन केबल टाकने आवश्यक असल्याचे सांगीतले. याचा अर्थ केवळ केबल उपलब्ध करून विद्युत पुरवठा पुर्ववत करण्यात आला नसल्यामुळे आंबेडकर चौक सिडको ते रमामाता आंबेडकर चौक उस्मान नगर रोड सिडको आणि पुढे गोविंद गार्डन पर्यंतची स्ट्रीट लाईट गेल्या दिड ते दोन वर्षांपासून बंद अवस्थेत होते.
माजी नगरसेविका सौ.वैजयंती गायकवाड यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि आयुक्तांनी घेतलेली गंभीर दखल घेतली. यामुळे बंद असलेले स्ट्रीट लाईट चालु करण्यासाठी आवश्यक असलेली केबल खरेदी करण्याचे आणि असदवन येथील S – 4 / S – 6 जलकुंभा पासुन ते आंबेडकर चौकात पर्यंतचे जलवाहीन्या जोडण्याचे काम एक महिन्याच्या आत पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत स्ट्रीट लाईट चालु होतील आणि असदवन येथील अतिरिक्त जलकुंभ आणि जलवाहीन्याचे जेएनयू आरएम अंतर्गत राहीलेले काम पूर्ण करुन नवीन वस्त्यांना सप्टेंबर २०२४ पर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याचे संकेत मिळाले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. त्यामुळे नागरी समस्यांचे स्वरूप जटील झाले आहे. काही ठराविक माजी नगरसेवक आपल्या भागातील कामे करण्यासाठी पाठपुरावा करत आहे, सतत केलेल्या प्रयत्नांमुळे नवीन नांदेड शहरातील अनेक प्रश्न निकाली निघाले आहेत त्यामुळे नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.


