
नांदेड| रामनवमीच्या औचित्य साधत नांदेड येथे सलग चौथ्या वर्षी ‘श्रीराम पहाट’ या सुरमयी संगीत सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. पहाटेच्या मंगल वातावरणात सादर झालेल्या रामभक्तीपर गीतांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.


येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे सकाळी ६ वाजता या कार्यक्रमाची सुरुवात मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


या संगीत पर्वात प्रशांत काळुन्द्रेकर (मुंबई), प्रज्ञा देशपांडे (पुणे), संज्योती जगदाळे (मुंबई) यांसारख्या नामांकित गायकांनी “श्रीराम चंद्र कृपाळू”, “राम जन्मला”, “अवध में राम आये हैं” यांसह अनेक गीते सादर करून वातावरण भक्तिमय केले. त्यांच्या सादरीकरणाला मंदार गोडसे, विवेक परांजपे, यश सोमण यांसारख्या कलावंतांनी संगीतसाथ दिली. कार्यक्रमाची संकल्पना व निवेदन अॅड. गजानन पिंपरखेडे यांनी प्रभावीपणे साकारले, तर सूत्रसंचालन प्रख्यात गझलकार बापू दासरी यांनी केले.



यावेळी सामाजिक व धार्मिक कार्यासाठी अॅड. व्यंकटेश पाटणूरकर आणि अॅड. दिलीप ठाकूर यांना ‘रामसेवा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. कलागंण प्रतिष्ठान व श्रीराम भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याला नांदेडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर आयोजित या उपक्रमामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.




