नांदेड| महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्ज रकमेत एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत (ओटीस) देण्याबाबत सुधारित एकरकमी योजना 31 मार्च 2025 पर्यत लागू करण्यात आली आहे.
त्यानुसार थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेवून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एन. झुंजारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड- 431605 किंवा दूरध्वनी क्रमांक (02462) 220865 वर संपर्क साधावा, असे महामंडळाच्यावतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
उद्योग भवन येथे सोमवारी निर्यात प्रचालन कार्यशाळेचे आयोजन
जिल्हा उद्योग केंद्र, नांदेड मार्फत निर्यात प्रचालन कार्यशाळा सोमवार 16 डिसेंबर 2024 रोजी उद्योग भवन, पहिला मजला, सहकारी औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर, नांदेड येथे स. 9 ते दु. 2 वाजेपर्यंत आयोजित केली आहे. या कार्यशाळेस जिल्हयातील सर्व उद्योजक, औद्योगिक संघटना, शेतकरी कंपन्या, इच्छुक युवक-युवती तसेच सध्या कार्यरत निर्यातक्षम उद्योग घटक यांनी सहभागी व्हावे. तसेच सर्वानी या कार्यशाळेचा प्रचार, प्रसार व्हॉटसअप ग्रुप, सोशल मिडीया, स्थानिक नामांकित वर्तमानपत्रे इ.वर शेअर करावा. नांदेड जिल्हयाच्या विकासासाठी सर्वांनी सक्रीय योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य सचिव तथा महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.
या कार्यशाळेचा उद्देश हा राज्यामध्ये निर्यात क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि निर्यात वाढीला प्रत्येक जिल्हयाला उत्तरदायी बनविण्यासाठी राज्याकडून केंद्र शासनाच्या जिल्हा हे निर्यात केंद्र (District as Export Hub) उपक्रमाला प्रोत्साहन देणे हा आहे.
उद्योग संचालनालयाच्या संनियंत्रणाखाली जिल्ह्यामध्ये या कार्यशाळेसाठी सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम घटक निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नव उद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समुह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधीत उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यातसंबंधी कामकाज करणारे घटक इ. चा सहभाग असणार आहे. या कार्यशाळेत विदेश व्यापार महानिदेशालय (DGFT), पुणे येथील तज्ञांची टीम निर्यातबाबत सादरीकरण करणार आहेत. या कार्यशाळेस जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे मार्गदर्शन मिळणार असून या समितीचे सर्व सदस्यदेखील सहभागी होणार आहेत. निर्याती संदर्भात अडी-अडचणी, विविध योजनांबाबत प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असून तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.