नांदेड| गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या वतीने “हिंद की चादर” श्री गुरु तेग बहादर साहिब जी यांच्या ३५० व्या शहादत (बलिदान) समागम निमित्त दिनांक २३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब, नांदेड येथे विविध धार्मिक, सामाजिक व सेवा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.


या कार्यक्रमांचे आयोजन आदरणीय पंज प्यारे साहिबान यांच्या सरप्रस्तीखाली व गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे मा. प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंह जी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.


विशेष कीर्तन दरबार: २३ ते २५ नोव्हेंबर दरम्यान तख्त सचखंड साहिबच्या दरबार साहिब परिसरात दररोज सकाळी व संध्याकाळी कीर्तन दरबार भरविण्यात येणार आहे. यात पंथप्रसिद्ध रागी जत्थे, कथाकार व प्रवचनकार सहभागी होऊन श्री गुरु तेग बहादर साहिब जी यांच्या जीवन व बलिदानावर आधारित कीर्तन व प्रवचन सादर करतील.


सद्भावना रॅली: युवा पिढीत प्रेरणा निर्माण व्हावी या हेतूने शालेय विद्यार्थ्यांची सद्भावना रॅली आयोजित करण्यात आली असून ती खालसा हायस्कूल प्रांगणातून सुरू होऊन गुरुद्वारा सचखंड साहिब येथे समारोप पावेल.

सर्व धर्म सम्मेलन व सेमिनार: श्री गुरु ग्रंथ साहिब जी भवन येथे “सर्व धर्म सम्मेलन” व सेमिनार आयोजित करण्यात आले आहेत. या ठिकाणी विविध धर्मांचे विद्वान, प्रमुख वक्ते आणि विचारवंत श्री गुरु तेग बहादर साहिब जी यांच्या त्याग, सहिष्णुता व मानवतेच्या संदेशावर विचारमंथन करतील.
वैद्यकीय सेवा शिबीर: श्री दशमेश हॉस्पिटल आणि महाराजा रणजित सिंह जी यात्री निवास येथे रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी, दंत चिकित्सा, नेत्र तपासणी, हृदय विकार तज्ञांचे कॅम्प, तसेच मोफत रक्त तपासणी व डायलेसिस कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत.
या सर्व कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंह यांनी सर्व विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी यांना आवश्यक त्या तयारीचे निर्देश दिले आहेत. सर्व श्रद्धाळू, नागरिक व सेवकांना आवाहन करण्यात येते की, श्री गुरु तेग बहादर साहिब जी यांच्या ३५० व्या शहादत व गुरतागद्दी समर्पित या पवित्र समागमात सहभागी व्हावे आणि या धार्मिक, सामाजिक उपक्रमांचा लाभ घ्यावा.


