नवीन नांदेड | पंचक्रोशीतील प्रसिध्द असलेल्या अळणी बुवा मठ तारातीर्थ, संत गौतमेश्वर संत संगम, धनेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार, 19 जानेवारी रोजी भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेनिमित्त भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.


यात्रेच्या दिवशी सकाळी 5 ते 8 वाजेदरम्यान रुद्राभिषेक संपन्न होणार असून 1008 श्री यदुबन महाराज कौलंबी आणि श्री आनंदबन गंभीरबन महाराज यांच्या पावन हस्ते हा विधी पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत गुरुवाणी व गुरुपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

भाविकांसाठी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी 12 ते 3 या वेळेत किर्तनसेवेचे आयोजन असून या किर्तनात तारातीर्थ महात्मा ह.भ.प. सखाराम महाराज सुकळीकर आणि ह.भ.प. हरी महाराज येळेगावकर आपल्या अमृतवाणीने उपस्थित भक्तगणांना मार्गदर्शन करणार आहेत.


या धार्मिक यात्रेत पंचक्रोशीसह दूरदूरच्या भागातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. यावर्षीही सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे रावसाहेब महाराज, श्री संत चरण रज दास, श्री बाळगिर पंचमगिर गौतमाश्रमी, अळणी बुवा मठ तारातीर्थ यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

🙏 भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक वातावरणात पार पडणाऱ्या या यात्रेला भाविकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आयोजकांनी सांगितले आहे.

