नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रशासनाने न्यायालयीन आदेशाच्या नावाखाली बोनस वाटपात पक्षपात करुन काही जणांना डावलल्याच्या निषेधार्थ मराठवाडा नगरपालिका, महापालिका कामगार कर्मचारी युनियन (लालबावटा) च्यावतीने आज मनपा कार्यालयासमोर तीव्र बोंब मारो आंदोलन करण्यात आले. या संदर्भात चौकशी करुन लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन प्रशासनाच्यावतीने उपायुक्त गुलाम सादीक यांनी आंदोलनकर्त्यांना दिले आहे.


महानगरपालिकेच्या सफाई व ड्रेनेज, पाणी पुरवठा विभागातील निवडक कामगारांना बोनस वाटप केले. असंतोष वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाडा नगरपालिका, महापालिका कामगार कर्मचारी युनियन (लालबावटा)ने नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त यांना लेखी निवेदन देत सरसकट सर्व कामगारांना तातडीने थकित बोनस वाटप करण्याची मागणी केली होती.


यावेळी युनियनचे कार्याध्यक्ष ऍड. कॉ. प्रदीप नागपूर्कर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सफाई व ड्रेनेज, पाणीपुरवठा विभागातील काही कामगारांना बोनस पासून वंचित ठेवले. त्यामुळे कामगारांना दिवाळी साजरी करता आली नाही. यावेळी कामगारांच्या शिष्टमंडळाने उपायुक्त गुलाम सादिक यांना भेटून मागण्यांचे निवेदन सादर केले. सादिक यांनी या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करुन येत्या दोन-चार दिवसात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. त्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन-कर्त्यांनी आपले आंदोलन तुर्त स्थगित केले आहे.


या आंदोलनाचे नेतृत्व मराठवाडा नगरपालिका, महापालिका कामगार कर्मचारी युनियन (लालबावटा) चे कार्याध्यक्ष तथा कामगार नेते ऍड.कॉ. प्रदीप नागापूरकर, भाकपचे जिल्हा सचिव कॉ.शिवाजी फुलवळे, कॉ.वैशाली धुळे, कॉ.गणेश संदुपटला यांच्या नेतृत्वात कॉ.भगवान नाईक,कॉ.दिगंबर गजभारे, राहुल बुक्तरे, गोविंद सरपाते, सिताराम हटकर, कपिल राऊत, राजू गजभारे, शंकर लांबटिळे, संदीप वायवळ, अर्चना देविदास मांजरमकर, शोभा गजभारे, शोभाबाई मवाडे, रवी वाहुळे, किरण खंदारे, सूर्यकांत कांबळे, मुखीद पठाण, शेख महाबोद्दीन, देवानंद हणमंते, विकास सोनकांबळे यांच्यासह पाणीपुरवठा, ड्रेनेज, सफाई कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



