हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले. एकूण 82 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, आता शहराचा नगराध्यक्ष कोण होणार? (Who is the mayor of Himayatnagar?) याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत काँग्रेस, भाजप, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी, शिवसेना उबाठा, कम्युनिस्ट पक्ष तसेच अपक्ष अशा अनेक गटांचा त्रिकोणी नव्हे तर बहुकोनी सामना होत असून, निकाल अत्यंत रोमहर्षक आणि धक्कादायक ठरणार आहेत. मतदारांच्या चर्चेनुसार अनेक प्रभागात क्रॉस वोटींग झाली असून, याचा नेमका फायदा कुणाला..? होणार यावरहीं गप्पा रंगू लागल्या आहेत.


नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे निकालात विलंब – उमेदवार नाराज
3 डिसेंबर रोजी निकालाला सुरुवात होणार होती. मात्र, नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना, कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे. या निवडणुकीत अनेक मात्तब्बर नेते कार्यकर्त्यांनी साम, दाम, दंड भेद या नीतीचा वापर करून निवडणूक काळात खळबळ उडवून दिली होती. तर एका एका नोटांचा भाव पाच अंकापर्यंत गेला होता. मतदान झाल्यानंतर निकालाला विलंब असल्याने आता चौकाचौकात कोण निवडून येणार याची चर्चा होत असून, यावरून पैजा लागण्यास देखील सुरुवात झाली आहे.

नगराध्यक्ष पदाचे 7 उमेदवार – नगरसेवक पदाचे 75 उमेदवार
हिमायतनगर नगरपंचायतीतील 17 प्रभागांमध्ये एकूण 17326 मतदार असून नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार, तर नगरसेवक पदासाठी तब्बल 75 उमेदवार रिंगणात आहेत. शहरभरात एकूण 21 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. संध्याकाळी 6 नंतरही काही केंद्रांवर मतदार रांगेत असल्यामुळे मतदान उशिरापर्यंत सुरु होते.
बाहेरगावी असलेले मतदारही दाखल – शहरात लोकशाहीचा उत्सव
मुंबई, पुणे, हैदराबाद अश्या मेट्रो शहरामध्ये उपजिवेकेसाठी वास्तव्यास गेलेल्या अनेकांनी निवडणूक रिंगणात उमेदवारांच्या आग्रहास्तव मूळ गावी विविध ठिकाणांहून मतदानासाठी शहरात दाखल झाले. दिवसभर मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. वृद्ध, अपंग, महिला व युवकांनी उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात होता.


मतदान निरीक्षकांनी विविध केंद्रांना भेट देत संपूर्ण प्रक्रियेचे निरीक्षण केले. सायंकाळ पर्यंत टक्केवारी 77.71% मतदान झाले असून, 13464 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी पुरुष : 6449 महिला 6515 असे एकूण मतदान झाले असल्याचे निवडणूक विभागाने कळविले आहे. सायंकाळी 6.30 नंतरही काही केंद्रांवर मतदान सुरू असल्याने अंतिम टक्केवारी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही.

राजकीय ‘गणित’ कोडे कायम – कोणाच्या खात्यात नगराध्यक्षपद?
मतदान संपताच विविध पक्ष आणि गटांत आकडेमोड, अंदाज, वर्तवत नाडी पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेस, भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी, शिवसेना उबाठा अशा प्रमुख पक्षांमध्ये काट्याची टक्कर आहे. राजकीय जाणकारांच्या मते काही प्रभागांमध्ये मतदारांनी क्रॉस वोटिंग करताना वेळ लागत असल्याने अनेकांनी सांगितले. स्थानिक गटबाजी, जातीय समीकरणे आणि शेवटच्या क्षणी झालेली मते, मतदार वळविण्यासाठी पक्ष कार्यकर्ते आणि उमेदवार यांची चढाओढ निकालावर मोठा प्रभाव टाकू शकते.

