किनवट,परमेश्वर पेशवे| किनवट माहूर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला असून खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी आज स्थितीला पहावयास मिळत आहे. त्यातच वेगवेगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात कोलांट उड्या मारताना दिसून येत आहेत.
ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडून आले त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये किनवट मतदार संघात कार्यकर्त्यानी या पक्षांतून दुसऱ्या पक्षात पक्षप्रवेश करण्यास सुरुवात केल्याने मतदार मात्र संभ्रमात व राजकीय पक्षाची नेते मंडळी भ्रमात असल्याची भयावाह चित्र संपूर्ण मतदारसंघातील ग्रामीण भागातील तांडे वाड्यामध्ये पहावयास मिळत आहे. त्यातच जबाबदार राष्ट्रीय पक्षात पदाधिकारी असलेली काही कार्यकर्ते मंडळी दिवसा अपक्ष सचिन नाईका सोबत शिटीचा प्रचार करताना प्रचार करताना फिरताना दिसून येतात.
तर सायंकाळी शरद चंद्र पवार गटाच्या माजी आमदार प्रदीप नाईकांच्या तुतारीला मिठी मारताना पहावयास मिळत आहेत. त्यामुळे मतदाराचा कार्यकर्त्यावरील विश्वास उडाल्या शिवाय राहणार नाही तितकेच खरे आपला कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात जाऊ नये व दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ता कशा पद्धतीने आपल्याकडे खेचता येईल याची खबरदारी आज घडीला सर्वच राजकीय पक्षाची पदाधिकाऱी व नेते मंडळी घेत असताना पहावयास मिळत आहेत.
प्रचाराच्या शिल्लक राहिलेल्या पुढच्या पाच ते सहा दिवसात अजून काही मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता मतदारसंघांमध्ये नाकारता येत नाही दलबदलू कार्यकर्त्याकडे मतदार मात्र वेगळ्या नजरेनेच बघत आहेत एवढे मात्र निश्चित. पण कधी नव्हे ते कार्यकर्त्याला सुगीचे दिवस आले म्हणणे काही वावगे ठरणार नाही. अशा कोलांट उड्या मारणाऱ्या या कार्यकर्त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्याची मात्र गोची होणार एवढे मात्र तितकेच खरे असल्याच्या प्रतिक्रिया सुद्धा निष्ठावंत कार्यकर्ते मंडळी कडून ऐकावयास मिळत आहेत.