हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिके नष्ट; खासदार नागेश पाटील यांनी तातडीने आर्थिक मदत, पीकविमा दावे मंजूर करण्यास आणि बँक वसुली थांबवण्याची मागणी केली.
हिंगोली/नांदेड, अनिल मादसवार| हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मुसळधार पावसामुळे मोठ्या संकटात आले आहेत. हदगांव, हिमायतनगर, किनवट, माहूर, उमरखेड आणि महागांव तालुक्यांतील हजारो हेक्टर शेती नुकसानग्रस्त झाली असून अनेक घरं व ओढ्यालगत भागांवर पुराचा फटका बसला आहे.



गेल्या दोन महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिके पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत, माती वाहून गेली आहे आणि काही भागांत पिकांचे नुकसान अत्यंत गंभीर झाले आहे. पंचनामे वेळेत न होणे आणि नुकसानाचे वास्तविक मूल्यांकन योग्य प्रकारे न होणे यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

यावर प्रतिक्रिया देत, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सरकारकडे मागणी केली आहे की: सर्व शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५०,००० रूपये आर्थिक मदत जाहीर करावी. पीकविमा कंपन्यांनी तातडीने विमा दावे मंजूर करावेत. बँकांमधून वसुली थांबवावी. अतिरिक्त बियाणे व खतांचा पुरवठा सुनिश्चित करावा. पीक नुकसानाबरोबरच जनावर, घर आणि गोठ्यांचे नुकसान यासाठी स्वतंत्र आर्थिक मदत जाहीर करावी. शेतकरी वर्ग आता या आर्थिक मदतीची आणि तातडीने प्रशासनाकडून योग्य पावले उचलण्याची अपेक्षा करत आहे. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना पाठविण्यात आलेल्या पत्रात म्हंटले आहे.



