नांदेड| छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवाडा’ निमित्त नांदेड आणि अर्धापूर तालुक्यातील भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना विविध दाखले वाटपाचा कार्यक्रम १ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि नांदेड तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचे आयोजन उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते.


छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत उपविभागीय कार्यालय, नांदेड आणि तहसील कार्यालय, नांदेड यांच्या वतीने नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करून त्यांना आवश्यक असलेले विविध दाखले देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


या कार्यक्रमात भटक्या विमुक्त जातीचे नेते देविदास हादवे यांनी समाजाच्या विविध समस्या आणि अडचणी मांडल्या. त्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आणि नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांच्या हस्ते भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, रहिवासी दाखला आणि इतर आवश्यक दाखले वाटप करण्यात आले. यामध्ये वासुदेव, मसणजोगी, मुस्लिम मदारी, गाडी वडार, वाघे, गोसावी आणि गोंधळी समाजातील जवळपास १५० नागरिकांची उपस्थितीत होती.


यावेळी, समाजातील वंचित घटकांसाठी ‘सेतू’ मार्फत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नांदेड शहरातील सेतू केंद्र चालक विजय जोंधळे आणि अर्धापूरचे शिवप्रसाद पत्रे यांचा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.वाडी तांड्यावरील व वस्तीबाहेर राहणाऱ्या भटक्या विमुक्त जाती जमातीना शासनाच्या विविध योजना लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. सचिन खल्लाळ यांनी सांगितले.


या कार्यक्रमाला परभणीचे जिल्हा कोषागार अधिकारी निळकंठ पांचगे, नायब तहसीलदार संजय नागमवाड, नायब तहसीलदार सुनील माचेवाड, नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, पुरवठा निरीक्षक रवींद्र राठोड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
शासकीय वसतीगृह योजनेसाठी 26 ऑक्टोबरपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह योजना सुरु झालेली आहे.
वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी भोजन तसेच निवास व्यवस्था व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरीत करण्यात येते. तसेच शासकीय वसतीगृहासाठी पात्र असलेल्या तथापी गुणवत्तेनुसार व वसतीगृहाच्या क्षमतेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दिनदयाळ स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी विचारात घेतले जातील.
इच्छुक विद्यार्थी – विद्यार्थीनीनी जिल्ह्यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या बारावी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास असणाऱ्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक प्रथम वर्षातील अभ्यासक्रमाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सन 2025-26 या वर्षासाठी शासकीय वसतिगृह योजनाचे ऑनलाईन पध्दतीने अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर 26 ऑक्टोबर 2025 पर्यत भरावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी केले आहे.


