श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक 161 वरील कामावर पुन्हा एकदा वादाचे सावट आले आहे. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या रस्त्याच्या कासवगतीच्या कामामुळे नागरिक त्रस्त झालेले असतानाच, आता फूटपाथवर निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक वापरले जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक इलियास बावानी यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणाची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे दाखल करत दोन निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक तहसीलदारांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत


विशेष म्हणजे, या कामावर महामार्ग विभागाचे अधिकारी कधीही प्रत्यक्ष पाहणीस येत नाहीत, अशी स्थानिक नागरिकांचीही तक्रार आहे. परिणामी, केवळ तीन वर्षांतच माहूर–किनवट महामार्गाच्या अनेक ठिकाणी खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्त्याला भेगाही पडल्या आहेत.


माहूर हे तीर्थक्षेत्र असल्याने आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कुलदैवत रेणुका माता माहूर येथेच असल्यामुळे, या भागाला विशेष महत्त्व देत महामार्गाशी जोडण्यात आले. या कामासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला होता. तथापि, संबंधित ठेकेदाराने मुदत संपूनही काम पूर्ण केले नाही. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण वाढले आहे.


धनोडा मार्गाचे काम अद्याप अर्धवट स्थितीत असून वाहनधारकांना दररोज खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. अलीकडेच गुत्तेदाराने फूटपाथचे काम सुरू केले असले तरी निकृष्ट दर्जाच्या पेव्हर ब्लॉकचा वापर होत असल्याने हे काम बोगस व गैरप्रकारयुक्त असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निवेदनासोबत निकृष्ट दर्जाचे दोन पेवर ब्लॉक नायब तहसीलदार कैलास जेठे यांचे समक्ष देत गौण खनिजांच्या अवैध उपशाशी संबंधित तक्रारींचा ढीग वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या कामाची तपासणी करावी, अशी मागणी बावानी यांनी केली आहे. त्यांनी आज, दिनांक 9 ऑक्टोबर रोजी, संबंधित विभागांना दिलेल्या तक्रारीत गुणनियंत्रण तपासणीद्वारे पेव्हर ब्लॉकची चाचणी करण्याची मागणी केली आहे.

