माहूर, इलियास बावानी| बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीचा दर्जा व आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी अँड. प्रदीप राठोड आणि राहुल चव्हाण यांचे आमरण उपोषण पाचव्या दिवशीही सुरू आहे. किनवट-माहूर परिसरासह सर्व बंजारा समाजाकडून या उपोषणाला मोठा पाठिंबा मिळत आहे.


याआधी १२ ते १७ सप्टेंबर दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे अँड. राठोड उपोषणावर होते. त्यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून आठ दिवसात बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्याने ६ ऑक्टोबरपासून त्यांच्या मूळ गावी – निराळा तांडा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे.


उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत : हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला तत्काळ अनुसूचित जमाती (ST) आरक्षण लागू करावे, बंजार्यांच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडे शिफारस पाठवावी, समाजासाठी १० हजार कोटींच्या अर्थसंकल्पाची तरतूद करावी, १७ सप्टेंबर रोजी दिलेल्या पालकमंत्र्यांच्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी करावी.


उपोषणादरम्यान अँड. राठोड यांनी सांगितले की, स्वातंत्र्योत्तर काळात मराठवाड्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण झाले, पण आंध्र प्रदेशात मिळणाऱ्या अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून बंजारा समाज वंचित राहिला. तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यात असलेले कुटुंब आजही ST सवलती घेतात, पण त्याच कुटुंबातील काही सदस्य महाराष्ट्रात VJ/ OBC गटात मोडतात, ही मोठी विसंगती असल्याचे ते म्हणाले.


“आमची लढाई आदिवासी समाजाविरुद्ध नाही, शासनाच्या अन्यायाविरुद्ध आहे,” असे सांगत त्यांनी बंजारा समाजासाठी स्वतंत्र ‘ST-B’ आरक्षणाची मागणी केली. या उपोषणामुळे किनवट-माहूर तालुक्यातील बंजारा समाजात तीव्र आंदोलनाची भावना असून, लवकरात लवकर शासनाने बैठकीची कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी होत आहे.


