हदगाव, शेख चांदपाशा । हदगाव व तामसा येथील पीएमश्री दर्जा प्राप्त जिल्हा परिषद हायस्कूल प्रशालेतील उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरु होऊन पंधरवडा उलटला असतांना अद्यापही पाठ्यपुस्तके मिळाली नसल्याने त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे.


इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांशिवाय शिक्षण घेण्याची वेळ आल्याने पालकांमध्ये संतापाची भावना आहे. या संदर्भात संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी हदगाव गट शिक्षण विभागाला लेखी पत्र देऊन वस्तुस्थिती कळवली असली तरीही अद्याप शिक्षण विभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. शासनाने शाळेच्या पहिल्या दिवशीच दोन गणवेश व सर्व पाठ्यपुस्तकांचे वितरण होईल, अशी ग्वाही दिली होती. मात्र उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचे अद्यापही पुस्तकांपासून वंचित राहणे हे गंभीर अनागोंदीचे उदाहरण ठरत आहे.

शाळा उत्साहात सुरू झाली असली तरी शिकवणी अध्यापनासाठी आवश्यक असलेल्या पुस्तकां शिवाय वर्ग चालवण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. “शिकवायचं काय आणि शिकायचं काय?” असा प्रश्न शिक्षक व पालकांना सतावतो आहे. यामुळे उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड होत आहे. या बाबतीतप्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क केल्यानंतर संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी सांगीतले की “आम्ही पुस्तकांची मागणी केली आहे, मात्र ती अद्याप आली नाही,” असे स्पष्ट केले.


यावरून शिक्षण विभागाची उदासीनता स्पष्ट दिसून येते.दरम्यान, याबाबत आ. बाबूराव कदम-कोहळीकर यांना माहिती देण्यात आली असता, “मी लक्ष घालतो,” असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या कडून काहीही हालचाल न झाल्याने पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. हदगाव विधानसभा क्षेत्रातील अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यमान आमदारांनी याप्रकरणी तत्काळ लक्ष घालावे, अशी अपेक्षा पालक व स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


