महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा डंका सर्वात जोरात वाजत होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर तर ठाकरे यांच्या शिवसेनेने गद्दार, ५० खोके एकदम ओकेच्या घोषणांनी संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडला. परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालावर नजर टाकली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ठाकरे यांच्या शिवसेनेलाही म्हणावे तसे यश मिळाले नाही. उलटपक्षी त्यांचे नुकसानच अधिक झाले आहे. भाजपाचा पराभव झाला याच आनंदात असलेल्या ठाकरे गटाला या वास्तवाचे भान आहे की नाही माहिती नाही.
लोकसभा निवडणुकीत यावेळी सर्वाचे लक्ष लागले होते ते शिवसेनेकडे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर सामान्य नागरिक कोणाच्या बाजुने उभे राहतील याची उत्सुकता सर्वानाच होती. तथापि लोकसभा निवडणुकीचा सखोल अभ्यास केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे या निवडणुकीत नुकसान जास्त झाले. तसेच जो विजय मिळाला तो स्वबळाचा नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने शिवसेनेत उभी फूट पाडली. त्यानंतर भाजप-शिवसेनेतील वैर अधिक वाढले. ते इतके विकोपाला गेले की, गेली अडीच वर्षे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदे व भाजपवर टीकेचे क्षेपणास्त्र डागले जात होते. त्यामुळे या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतात याची उत्सुकता सर्वाना होती. मतदारांनी ठाकरे गटाला ९ तर शिंदे गटाला ७ जागा दिल्या. मतदारांनी तरी खरी शिवसेना कोणाची याचे उत्तर गुलदस्त्यातच ठेवले. उद्धव ठाकरे व संजय राऊत म्हणतात आमचीच शिवसेना खरी. (कायदेशीरदृष्ट्या काहीही असो, शिवसेना ठाकरेंचीच हे सत्य आहे) ते खरे मानले तर यापूर्वी राज्यात शिवसेनेचे १८ खासदार होते. आता ती संख्या ९ झाली आहे. खासदारांची संख्या कमी झाली. त्यात शिवसेनेच्या स्थापनेपासून मुंबई, ठाणे हे सेनेचे बालेकिल्ले मानले गेले. यावेळी मुंबईत सेनेने ४ जागा मिळवत चांगले यश मिळविले. परंतु ठाणे जिल्हा गमावला. आनंद दिघेपासून सेनेचा बालेकिल्ला असलेला ठाणे जिल्हा शिवसेनेला जिंकता आला नाही. तिथे एकनाथ शिंदे वरचढ ठरले. मुंबई, ठाण्यानंतर शिवसेनेने आपले पहिले पाऊल राज्यात संभाजीनगरला ठेवले. तेव्हापासून संभाजीनगर शिवसेनेच्या अधिपत्याखाली होते. या निवडणुकीत शिवसेनेने (ठाकरे गट) संभाजीनगरचा बालेकिल्लाही गमावला. त्यानंतर शिवसेनेचा दुसरा बालेकिल्ला कोकण होते. यावेळी शिवसेनेने कोकणही गमावले. एकेकाळी शिवसेनेचेच असलेल्या नारायण राणे यांनी सेनेच्या विनायक राऊत यांचा पराभव केला. हा पराभव सेनेच्या जिव्हारी लागण्यासारखा आहे. कोकणातून आता शिवसेना हद्दपार झाल्याचेच चित्र आहे.
राज्यात इतरत्र शिवसेनेला जागा मिळाल्यात परंतु त्या जागा मतदारांचा नाईलाज म्हणून मिळाल्या आहेत. शिवसेनेवर प्रेम करणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे म्हणून सेना जिंकलेली नाही. उदाहरणादाखल काही लढतीचा विचार करता येईल. परभणीत संजय उर्फ बंडू जाधव गेल्या अनेक निवडणुकात खाण विरुद्ध बाण हा नारा देत निवडून येत असत. मुस्लीम मते त्यांना यापूर्वी कधीही मिळाली नाहीत. किंबहुना मुस्लीम मतदारा विरोधातच ते हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन लढत व जिंकून येत. यावेळी त्यांचे निवडणूक चिन्ह बाण नव्हते. मुस्लीम समाज हा शिवसेनेच्या सदैव विरोधात राहिलेला आहे. शिवसेनेची कट्टर हिंदुत्वाची भूमिका त्यांना कधीही पटली नाही. त्यात बाळासाहेब ठाकरे प्रखर हिंदुत्ववादी नेते होते. बाबरी मसजीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे हे बाळासाहेबांचे वाक्य त्याकाळी खूप गाजले होते. त्यामुळे मुस्लीम मतदार कधीही शिवसेनेच्या जवळपास फिरकला नाही. परंतु यावेळी या मतदारांचा नाईलाज झाला. याचे कारण यावेळी मुस्लीम मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्वेषाने उतरला होता.
मोदींचा पराभव करण्यासाठी भाजपाच्या विरोधात जो कोणी तुल्यबळ उमेदवार असेल त्याला मतदान करा असे मेसेज फिरत होते. परभणीत काँग्रेसचा उमेदवार नव्हता. त्यामुळे महादेव जानकर यांच्या विरोधात तुल्यबळ असलेल्या संजय जाधव यांच्याबाजुने बहुसंख्य मुस्लीम मते वळली. घटना बदलण्याच्या मुद्यावर यावेळी दलित समाजातही बराच रोष होता. त्यामुळे ही मतेही यावेळी भाजपाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात गेली. भाजपाचा पराभव करण्यासाठी ही सर्व मते शिवसेनेकडे गेली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला शिवसेनेचा विरोध होता. या मागणीवर बाळासाहेबांनी सडकून टीका केली होती. तेव्हापासून दलित मते शिवसेनेकडे कधी केली नाही. परंतु परभणीत अन्य पर्याय नसल्याने ही मतेही सेनेला मिळाली.
हिंगोली मतदार संघात तर यावेळी शिवसेना विरोधात शिवसेना अशीच लढत होती. या मतदार संघात दलित आणि मुस्लीम मते शिवसेनेच्या नागेश आष्टीकर यांनाच मिळाली. मुस्लीम आणि दलित मतदारांचा नाईलाज होता. इतर उमेदवारांना देऊन मते खराब करण्यापेक्षा भाजप विरोधात विजयी होणा-या उमेदवाराला मते देण्याचा निर्णय या मतदारांनी घेतला. शिवसेनेवरच्या प्रेमापोटी किंवा सेनेची व्होट बँक म्हणून ही मते शिवसेना उमेदवारांना मिळाली नाहीत. आजवरच्या निवडणुकीचा अभ्यास केला तर मुस्लीम आणि दलित मते ही काँग्रेसची पारंपारिक मते राहिली आहेत. त्या मताच्या बळावरच काँग्रेसने इतकी वर्षे देशात सत्ता मिळविली. परंतु या निवडणुकात अनेक ठिकाणी काँग्रेस उमेदवार नसल्याने आणि भाजपाचा पराभव करायचा हा हेतू असल्याने ही मते शिवसेनेकडे वळली. या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार असता तर तोही जिंकला असता. कारण काँग्रेसच्याच पारंपारिक मतावर सेनेला विजय मिळाला आहे हे वास्तव लक्षात घेण्याची गरज आहे.
सांगलीच्या जागेचा मुद्दा प्रतिष्ठेचा करुन उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली. कोणाशीही चर्चा न करता त्यांची उमेदवारी जाहीर केली. हा वाद पराकोटीला गेल्यानंतरही ठाकरे, संजय राऊत यांनी सामंजस्याची भूमिका घेतली नाही. आघाडीचा धर्म पाळला नाही. परिणाम असा झाला की, चंद्रहार पाटलांवर अनामत रक्कम गमावण्याची वेळ आली.
दुसरी अत्यंत महत्वाची बाब म्हणजे मराठवाड्यात जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाची मते युतीच्या विरोधात गेली. परंतु त्यातही एक आश्चर्यकारक बाब आहे. ज्या मतदार संघात युती-आघाडीचे दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे आहेत. त्या मतदार संघात मराठा समाज मोठ्या प्रमाणात आघाडीच्या बाजुने गेला. त्यामुळे युतीच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. परंतु ज्या मतदार संघात आघाडीचा उमेदवार मराठा समाजाचा नाही. परंतु युतीचा उमेदवार मराठा समाजाचा आहे. त्या मतदार संघात मराठा समाजाने मराठा समाजाच्या उमेदवाराला मते दिली. संभाजीनगरच्या संदीपान भुमरे यांचा विजय हा त्याचे द्योतक आहे. या मतदार संघात विद्यमान खासदार इम्तियाज जलील, महाआघाडीचे चंद्रकांत खैरे हे उमेदवार होते. संदीपान भुमरे हे एकमात्र मराठा उमेदवार होते. त्यामुळे ते विजयी झाले.
लोकसभ निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्रातील मतदारांनी चांगलाच धडा शिकविला. काँग्रेसला नवसंजीवनी दिली. बंडखोरी करुनही सांगलीत काँग्रेस विजयी झाली. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसलाही लोकांनी चांगले समर्थन दिले. या दोघांचेही विजयही स्वबळावरचे आहेत. मतदारांचा नाईलाज झाला म्हणून त्यांचे उमेदवार विजयी झाले नाहीत. शिवसेनेत मोठे बंड करुनही एकनाथ शिंदे यांनी ७ खासदार निवडून आणले. मोदी, फडणवीस, भाजप विरोधात एवढी लाट असतानाही त्यांच्यासोबत राहून शिंदेनी हे यश मिळविले. त्या कसोटीवर शिवसेना उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या यशाचे मुल्यमापन करायचे ठरविले तर परिस्थिती फारसी उत्साहवर्धक आहे असे नाही हे मात्र निश्चित. बाकी जय-पराजयाचा अर्थ कोणी कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
लेखक….विनायक एकबोटे, ज्येष्ठ पत्रकार नांदेड, दि. ७-६-२४, मो.नं.7020385811