नांदेड। स्वतःच्या मालकीचे प्लॉट क्र. 2 व 3 ची गुंठेवारी करण्यासाठी महानगरपालीका येथील संभाजी माधवराव काष्टेवाड, पद – प्रभारी सहा. आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका, महेंद्र जयराम पठाडे, पद – प्रभारी वसुली लिपिक, नेम. नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका, क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 6, सिडको, नांदेड. रा. वैभव नगर, नांदेड. यांनी तक्रारदार यांना रु. 25,000/- (ज्यामध्ये प्लॉटचे टॅक्स 3499/- रूपये, दोन प्लॉटची नामपरिवर्तन फि 13670/- रूपये व उर्वरित 7831/- रूपये लाच) मागितली आणि पंचासमक्ष रु. 21,500/- स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
यातील तक्रारदार यांनी मौजे असदवन येथे सन 2021 मध्ये 12 प्लॉटस् खरेदी केले होते. त्यापैकी त्यांना प्लॉट क्र. 2 व 3 ची गुंठेवारी करणे असल्याने त्यांनी महानगरपालीका येथे जावून माहिती घेतली. नमूद प्लॉट हे यापूर्वीचे मालकाच्या नावाने दाखवत असल्याने त्यांनी म.न.पा. झोन क्र. 6 मध्ये जावून सहा. आयुक्त काष्टेवाड यांना भेटले असता, त्यांनी सदर भागाचे बिल कलेक्टर महेंद्र पठाडे आहेत, तुम्ही त्यांना भेटा, मी त्यांना सांगतो. त्याप्रमाणे पुर्तता करा. तुमचे काम होवून जाईल असे म्हणाले.
त्यावरून तक्रारदार हे बिल कलेक्टर महेंद्र पठाडे यांना भेटले असता त्यांनी तक्रारदार यांना दोन प्लॉटचे 25000/- रूपये लागतील. त्यात दोन प्लॉटचे पावत्या मिळून जातील, उर्वरित काष्टेवाड साहेबांचे व माझे असतील असे सांगितले. सदरचे उर्वरीत रक्कम ही लाच असल्याची तक्रारदार यांना खात्री झाली. त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी दिनांक 08/10/2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे याबाबत तक्रार दिली.
दिलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेडकडून दिनांक 09/10/2024 रोजी लाच मागणी पडताळणी कार्यवाही करण्यात आली. कार्यवाहीत महेंद्र पठाडे यांनी तक्रारदार यांचेकडून पूर्वी मागितलेल्या 25000 रुपयापैकी प्लॉटचे 3499/- रूपयाचे टॅक्स भरून शासकीय पावती दिली व उर्वरित राहिलेल्या लाचेची पंचासमक्ष मागणी केली. त्यानंतर दि. 15/10/2024 रोजी आलोसे संभाजी काष्टेवाड यांनी लाच मागणी पडताळणीमध्ये पंचासमक्ष लाच स्विकारण्याचे मान्य केले. त्यानंतर महेंद्र पठाडे यांनी तक्रारदार यांच्याकडून दोन प्लॉटसचे 13670/- रूपयाची दोन प्लॉटची नामपरिर्वतन फि व उर्वरित 7831/- रूपयाची लाच असे एकुण 21500/- रूपये महानगरपालीका क्षेत्रीय कार्यालय क्र. 6 सिडको, नांदेड येथे पंचासमक्ष स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले आहे. यातील दोन्ही आरोपी लोकसेवकांना ताब्यात घेण्यात आले असून पो.स्टे. नांदेड ग्रामीण, जि.नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कार्यवाही मा.श्री संदीप पालवे पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड, परिक्षेत्र, नांदेड. मो.क्र. 9545531234, मा.डॉ. संजय तुंगार, अपर पोलीस अधीक्षक, अँटीकरप्शन ब्युरो नांदेड, परिक्षेत्र नांदेड, मो.क्र. 9923701967, पर्यवेक्षण अधिकारी श्री प्रशांत पवार, पोलीस उप अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, नांदेड मो.क्र. 9870145915 यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी श्रीमती स्वप्नाली धुतराज, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड, सापळा कारवाई पथक* – अँटी करप्शन ब्युरो टीम, नांदेड. यांनी केली आहे.
या कार्यवाही नंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले की, त्यांच्याकडे कोणत्याही लोकसेवकाने, शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करून दुरध्वनी 02462-253512, टोल फ्रि क्रमांक 1064 जारी केला आहे.