नांदेड | पुणे शहरात खून करून फरार झालेल्या दोन आरोपींना नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असून, ही कारवाई नांदेड ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.


अविनाश कुमार (पोलीस अधीक्षक, नांदेड), मा. श्रीमती अर्चना पाटील (अपर पोलीस अधीक्षक, भोकर), मा. श्री. सुरज गुरव (अपर पोलीस अधीक्षक, नांदेड) तसेच मा. श्री. प्रशांत शिंदे (उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

आरोपी संदीप रंगराव भुरके (वय 28, व्यवसाय – मजुरी, रा. चिखलवाडी, ता. भोकर, जि. नांदेड) ओमप्रकाश गणेश किरकन (वय 24, व्यवसाय – मजुरी, रा. चिखलवाडी, ता. भोकर, जि. नांदेड) यांच्यावर पुणे शहरातील आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 365/2025 अंतर्गत कलम 103(1), 3(5) बी.एन.एस. सह 4/25 भारतीय शस्त्र अधिनियम प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल होता.


दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 6.45 वाजता, गुरुदत्त वॉशिंग सेंटर, आंबेगाव (पुणे) येथे काम करत असताना जावेद खाजामीया पठाण यांच्यावर आरोपींनी लोखंडी हत्याराने डोके व हातावर वार करून गंभीर जखमी केले. प्रेमसंबंधाच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आला असून उपचारादरम्यान जावेद पठाण यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पुणे शहरातून फरार झाले होते. आरोपी भोकर (जि. नांदेड) येथील असल्याची माहिती मिळाल्यानंतर आंबेगाव पोलीस स्टेशनने नांदेड ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला.

नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड व पथकातील अंमलदारांनी गोपनीय बातमीदारांच्या मदतीने माहिती संकलित केली असता आरोपी वानेगाव परिसरात दबा धरून बसल्याची माहिती मिळाली. अथक परिश्रमांनंतर गुन्हे शोध पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे येथील पोलीस उपनिरीक्षक मोहन कलमकर यांच्या ताब्यात दिले.
या यशस्वी कारवाईत सहभागी असलेले पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड, पोहेकॉ अर्जुन मुंडे, शेख सत्तार, पोको समीर अहमद, गवेंद्र सिरमलवार, शंकर माळगे (सर्व – गुन्हे शोध पथक, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण) यांच्या कार्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी विशेष कौतुक केले आहे.

