लोहा| लोहा शहरातील मुख्य रस्त्यावरील इंदिराई हार्डवेअर अँड पेंट हाऊस या दुकानाला झालेल्या शॉर्टसर्किटमुळे सोमवारी रात्री भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत शेजारील वैष्णवी बॉडी बिल्डर्स आणि शिवकाशी वेल्डिंग वर्कशॉप ही दुकानेही जळून खाक झाली. घटनेत सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. आग लागल्याची माहिती मिळताच नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार व त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि परिस्थितीवर नियंत्रित करण्यासाठी समन्वय साधला.

अपघाताची कारणमीमांसा
लोहा शहरातील मुक्ताईनगर समोरील मुख्य रस्त्यावर सतीश अशोकराव शेटे यांचे इंदिराई हार्डवेअर व पेंट हाऊस आहे. रस्त्यावरील विद्युत खांबाला एका वाहनाने जोरदार धडक दिल्याने स्पार्किंग झाली आणि त्यातून शॉर्टसर्किट होऊन दुकानाला आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले आणि परिसरात मोठी गर्दी झाली.


नगराध्यक्ष शरद पवार यांची तत्परता — मोठा अनर्थ टळला
आगीची माहिती मिळताच नगराध्यक्ष शरद पवार व सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आमदार प्रतापराव चिखलीकर यांना घटनेची माहिती देऊन नांदेड, अहमदपूर आणि कंधार येथील अग्निशमन दलाची अतिरिक्त वाहने मागवली.

नगराध्यक्ष पवार यांनीच तातडीने पाण्याची व्यवस्था केली. चार तासांच्या कार्यवाहीनंतर आग आटोक्यात आली. यावेळी केशवराव मुकदम, हरिभाऊ चव्हाण, छत्रपती धुतमल, संभाजी चव्हाण, भास्कर पवार, करिम शेख, सलीम शेख, बाळू पवार, मारुती जंगले, दत्ता शेटे, सदा तेलंग मदतीला धावून आले. नागरिकांमध्ये नगराध्यक्षांच्या कामाची सोशल मीडियात मोठी चर्चा होत आहे.
आमदार चिखलीकर यांची पाहणी — प्रशासनाला स्पष्ट सूचना

आगीची माहिती मिळताच आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला व प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. “नुकसानीचे योग्य पंचनामे करून बाधितांना तातडीची मदत द्यावी. यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले.” यावेळी नगराध्यक्ष शरद पवार, तहसीलदार विठ्ठल परळीकर, पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, नगरसेवक केशवराव मुकदम, मारुती जंगले, सदानंद तेलंग, माजी संचालक अंकुश कदम, माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, महावितरण अधिकारी उपस्थित होते.

