नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही तासच उरले आहेत. या निवडणुकीनंतर महापालिकेत आता लोकनियुक्त प्रतिनिधींचे राज्य असणार आहे. नव्याने सत्तेवर येणारी राजवट ही लोकेच्छा पूर्ण करणारी आणि नागरिकांना अधिकाधिक सुविधा प्राप्त करुन देणारी असावी अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. सामाजिक आणि राजकीय स्तरावर नांदेडचा इतिहास अत्यंत उज्वल आहे. त्या उज्वल परंपरेचा नावलौकिक वाढेल अशी कामगिरी करणारे लोकप्रतिनिधी महापालिकेत असावेत एवढीच माफक अपेक्षा आहे.


नांदेड शहराची सर्वात महत्वाची समस्या ही वाहतुकीची आहे. नांदेड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस भरमसाठ वाढत आहे. त्या तुलनेने मुलभूत सुविधा कमी पडत आहेत. पूर्वी नांदेड शहरात रिजनल वर्कशाँप ते हबीब टाँकीज हा एकमेव मुख्य मार्ग होता. शहरातील सर्व वाहतुकीचा भार हा एकाच रस्त्यावर होता. परंतु जशी लोकसंख्या वाढत गेली तसे पर्यायी रस्तेही होत गेले. २००८ मध्ये श्री गुरुगोविंदसिंघजी महाराज यांच्या कृपेने शहराला विकासासाठी भरमसाठ विकास निधी मिळाला. देशाच्या इतिहासात एका वेळी एवढा निधी कोणत्याही जिल्हास्तरावरील शहराला मिळाला नाही. नवे नांदेड शहर वसविता आले असते. परंतु दुर्देवाने त्यावेळी विकासाचे योग्य नियोजन न करता घाईगर्दीने कामे करण्यात आली.

गुरु ग्रंथ साहिब त्रि शताब्दीचा कार्यक्रम उरकण्यात आला आणि मग पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी गत झाली. गुरु ग्रंथ साहिब त्रिशताब्दीसाठी आलेल्या किती निधीची विकास कामे झाली, खरोखरच सर्व निधी विकास कामावर खर्च झाला का, जी कामे झाली ती गुणवत्तेच्या दृष्टीने योग्य होती का हा सर्व संशोधनाचा विषय आहे. परंतु आज शहराची नेमकी गरज काय याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील वाहतूक ही सर्वात गंभीर आणि रोजच्या डोकेदुखीची समस्या आहे. त्यासाठी शहरात बर्की चौक ते तरोडा नाका असा लांबलचक उड्डाण पूल होण्याची गरज आहे. असाच एक उड्डाण पूल देगलूर नाका चौक परिसरातही होण्याची गरज आहे.


बर्की चौक ते तरोडा नाका पुलाच्या खाली दोन पिलरच्या मध्ये जी जागा राहणार आहे त्यात रस्त्यावरील गाड्यासाठी पार्किंगची व्यवस्था करता येईल. या शिवाय आज जसे हिंगोली नाका उड्डाणपुलाच्या खाली फूल विक्रेते बसतात त्याप्रमाणे त्या भागात पुलाच्या खाली मोकळ्या जागेत हातगाडीवालेही व्यवसाय करु शकतील. त्यामुळे रस्त्यावर कोठेही हातगाडीवाले व उभ्या वाहनाचा अडथळा राहणार नाही. शहराच्या सर्व भागात लोकांना तातडीने जाता येईल. आज परिस्थिती अशी आहे की, रिजनल वर्क शाँप वरुन हबीब टाँकीज या मार्गावर वाहन घेऊन जायचे म्हटले तर विलंब तर लागतोच शिवाय कोठे कोण गाडीला ठोकतो आणि अपघातात जीवाचे काही बरे वाईट होते का याचीच काळजी अधिक वाटते. आज शहराच्या कोणत्याही भागात वाहने उभी करण्याला पार्किंगची व्यवस्था नाही. लोकांना नाईलाजाने जागा मिळेल तेथे आपले वाहन उभे करावे लागते. त्यात पोलिस येऊन फोटो काढतात. वाहनचालकाला दीड दोन हजाराचा फटका बसतो. त्यातून वादविवाद होतात ते वेगळेच.

आजच्या घडीला टाँवर ते वजिराबाद चौक या मार्गावर वाहनाने जायचे म्हटले तरी अंगावर काटा येतो. ही समस्या दूर करण्यासाठी आता शहरात रस्ते मोठे करण्याचे काम सुरु आहे. अनेक भागात रस्त्याची कामे होत आहेत. परंतु रस्ते मोठे होऊनही समस्या कायम आहे. याचे कारण् रस्त्ता मोठा झाला तरी रस्त्याच्या बाजुला हातगाडीवाल्यांचे भरमसाठ अतिक्रमण आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहनेही रस्त्यावर आणि हातगाडीवालेही रस्त्यावर त्यामुळे रस्ते मोठे करुनही समस्या मात्र कायम आहे. त्यामुळे ही समस्या अत्यंत नियोजन करुन सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी शहराच्या विविध भागात उड्डाण पुलाची निर्मिती करणे गरजेचे आहे. जाता जाता आता जे शहरात सिमेंटचे रस्ते होत आहेत. त्यात कोठेही गजाळीचा वापर करताना दिसत नाहीत. सिमेंट, रेती, गिट्टी कालवून रस्त्यावर अंथऱली जात आहे. त्यामुळे हे रस्ते किती काळ टिकतील याबाबत साशंकता आहे.
हे रस्ते बनविणा-या कंपनीच्या एकाला मी विचारले की, रस्ते टिकतील का? त्यावर तो म्हणाला, २५ वर्षे रस्त्याला काही होणार नाही. हे खरे नाही. सध्याच्या काळात कोणताही कंत्राटदार २५ वर्षे टिकतील असे रस्ते बनविणार नाही. तो बनविणार असला तरी राजकीय पक्षाचे नेते त्याला बनवू देणार नाहीत. कारण मग २५ वर्षे रस्त्याची कामे होणार नाहीत, त्यातून मग कमिशन मिळणार नाही आणि निवडणुकीत खर्च झालेला पैसा मिळणार नाही हे राजकीय नेत्यांना माहिती आहे. मी यापूर्वी एकदा लिहिले आहे. पुण्याचा जंगली महाराज रस्ता ५० वर्षापूर्वी बनविण्यात आला. त्या रस्त्यावरची गिट्टीही उखडली नाही एवढा दर्जेदार रस्ता कंत्राटदाराने बनविला. परंतु त्या कंत्राटदाराला सरकारने पुढे कधीही रस्ता बनविण्याचे काम दिले नाही. त्यामुळे शहरातील विकास कामे फार दर्जेदार होतील अशी अपेक्षा नागरिकांनी करु नये.
नांदेडची दुसरी महत्वाची समस्या आहे ती साफसफाईची. शहराच्या सर्व भागात स्वच्छता आहे असे चित्र दुर्देवाने दिसत नाही. नांदेड ही शीख धर्मियांची काशी आहे. श्री गुरुगोविंदसिंघजी महाराजांच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक या शहरात येतात. त्यात देशविदेशातील भाविक असतात. या भाविकांचा वावर गुरुद्वारा चौक, महावीर चौक, वजिराबाद चौक, टाँवर, नगिना घाट, बंदा घाट या भागात असतो. या भागातही घाणीचे साम्राज्य बारा महिने असते.
रस्ते धुळीने माखलेले, रस्त्याच्या कडेला केरकचरा, घाटावर कचरा असे चित्र असते. जे भाविक येथे येतात त्यांच्या सोबत नांदेड नगरीची काय स्मृती जात असेल याचा साधा कोणी विचारही करीत नाहीत. हे चित्र नव्या महापालिकेने तातडीने बदलण्याची गरज आहे. नांदेड शहराला गोदावरी सारख्या अत्यंत पवित्र व महान नदीचे वरदान लाभले आहे. भाविक अत्यंत श्रध्देने गोदा दर्शनासाठी नदीच्या तिरावर जातात. परंतु तेथेही फार स्वच्छता असते असे दिसत नाही. अत्यंत खेदाने असे म्हणावे लागते की, नांदेड शहरात पवित्र गोदावरी नदीची गटारगंगा झालेली आहे.
शहरातील अनेक घाण पाण्याचे नाले सरळ गोदावरी नदीत मिसळत असल्याने गोदावरीच्या पात्रात मुळ नदीचे पाणी किती आणि नाल्याचे पाणी किती यावर संशोधन करावे लागेल अशी स्थिती आहे. २०२७ मध्ये नाशिकला याच गोदावरी नदीवर कुंभमेळा भरणार आहे. त्यावेळी नाशिकला लाखो लोकांचा स्नानासाठी मेळा भरणारच आहे. परंतु ज्या लोकांना काही कारणाने नाशिकला जाता येणार नाही ते भाविक व श्रध्दाळू पर्व काळात आपल्या शहरातील गोदावरी नदीवर स्नानाला येणार आहेत. नुकताच झालेला कुंभमेळा प्रयागराजला गंगा नदीवर होता. त्यावेळीही पर्व काळात अनेक भाविक स्नानासाठी विष्णुपुरीला गोदावरी नदीवर आले. तेथे एवढी गर्दी झाली की, अनेकांना उर्वशी घाटावर यावे लागले. गंगा नदीवर कुंभमेळा असूनही एवढी गर्दी झाली.
आता तर धेट गोदावरी नदीवरच कुंभ मेळा होणार आहे. त्यावेळी केवळ शहरातीलच नाही तर आजुबाजुच्या जिल्ह्यातीलही हजारो भाविक गोदावरी नदीवर स्नानासाठी येतील. त्यावेळी किती गर्दी होईल. याचे नियोजन नव्या महापालिकेला आता पासून करावे लागेल. पर्वकाळात स्नानासाठी येणा-या भाविकांना स्वच्छ पाणी कसे मिळेल, स्नानासाठी काय सुविधा कराव्या लागतील याचे नियोजन आतापासून करावे लागेल. हे सर्व कठीण काम आहे. त्यासाठी गोदावरीला गटारगंगेतून बाहेर काढावे लागेल. गोदावरीत स्नान करणारा भाविक शुध्द होऊनही घरी परतला पाहिजेत, कोणताही आजार घेऊन जाता कामा नये ही काळजी घ्यावी लागेल.
शहराची तिसरी मुलभूत समस्या पाणी पुरवठ्याची आहे. गोदावरी सारखी नदी शहराच्या मध्यभागी आहे. उत्तरेकड आसना नदी आहे. विष्णुपुरी सारखा तीन टीएमसीचा क्षमतेचा बंधारा उशाला आहे. परंतु शहरात पाणी पुरवठ्याचे हाल आहेत. यावर्षी एवढा पावसाळा झाला. जवळपास ४०० टीएमसी पाणी गोदावरी नदीतून तेलंगणाकडे गेले, विष्णुपुरीची क्षमता नसल्याने सोडावे लागले. विष्णुपुरी ३ टीएमसीचे आहे. ते भरले तर वर्षभर शहराची पाणी टंचाईची समस्या मिटते.
४०० टीएमसी पाणी यावर्षी तेलंगणाला सोडावे लागले यावरुन विचार करा किती विष्णुपुरी बंधारे भरले असते. तरीसुध्दा शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. विकसित शहरात महापालिका चोवीस तास पाणी करतात. आपल्याकडे अजूनही तीन दिवसाआड पाणी पुरवठा होतो. नाही २४ तास तर किमान एकदिवसाआड लोकांना पाणी मिळाले पाहिजेत. शहराचा वाढता व्याप लक्षात घेता गोदावरीतून तेलंगणाकडे वाहणारे पाणी इकडेच अडविण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था महापालिकेला करावी लागेल. नव्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
शहरातील मल्टीपर्पज हायस्कुल आता महापालिकेकडे हस्तांतरीत केल्याचे ऐकिवात आहे. ते खरे असेल तर त्या ठिकाणी गोरगरिब विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करणे गरजे आहे. ते शिक्षण दर्जेदार असेल याचीही खबरदारी घेण्याची गरज आहे. याचे कारण खाजगी ज्या शाळा आहेत त्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्याची ऐपत गरीब पालक वर्गाची नसते. त्यामुळे त्यांची पाल्ये एकतर शिक्षणापासून वंचित राहतात आणि मग अशी मुले पुढे गुन्हेगारीकडे वळतात. त्यासाठी प्राथमिक शिक्षण दर्जेदार देऊन मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होईल याकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.
मल्टीपर्पज हायस्कुलच्या मैदानावर केवळ शाँपिंग काँम्लेक्स बांधण्यासाठी ही शाळा महापालिकेने घेतली असे चित्र पुढे दिसणार नाही याची खबरदारी नव्याने निवडून येणा-या सर्वच नगरसेवकांनी घ्यावी. शाळा राहिली पाहिजे, मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजेत आणि खेळासाठी मैदानही राहिले पाहिजेत.
शहराच्या या प्रमुख समस्यांचे निराकरण येत्या पाच वर्षात झाले तरी नागरिकांनी केलेल्या मतदानाचे सार्थक झाल्यासारखे होईल. छोट्या मोठ्या इतरही समस्या आहेत. पण सर्वाची आताच चर्चा करणे योग्य ठरणार नाही. वेळोवेळी त्यावरही प्रकाश टाकू. तुर्तास सर्वच उमेदवारांना शुभेच्छा.
लेखक…. विनायक एकबोटे, ज्येष्ठ पत्रकार नांदेड, दि. १३ जानेवारी २६, मो. नं. 7020385811.

