हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर तालुक्यातील सवना (ज), रमणवाडी, जिरोणा, गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, महादापूर, दगडवाडी, चिंचोर्डी, एकघरी, वाशी, पार्डी व पिछोडी परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाच शिव महादेव फाटा येथील पार्श्वनाथ महादेव यात्रेनिमित्त दि. ९ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


या स्पर्धेसाठी राज्यातील विविध भागातून दाखल झालेल्या मल्लांचे हिमायतनगरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी विशेष कौतुक केले. “कुस्ती हा केवळ खेळ नसून तो आपली परंपरा, संस्कार आणि आत्मशिस्त जपणारा सांस्कृतिक वारसा आहे. यात्रेत सहभागी झालेले मल्ल ही आपल्या ग्रामीण संस्कृतीची शान असून, त्यांचा सन्मान म्हणजेच आपल्या संस्कृतीचा सन्मान आहे,” असे प्रभावी उद्गार त्यांनी यावेळी काढले.


यात्रेदरम्यान कुस्ती पाहण्यासाठी भाविक व नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मल्लांनी सादर केलेल्या ताकद, कौशल्य व तांत्रिक डावपेचांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. कुस्ती स्पर्धेमुळे यात्रेचे धार्मिकतेसोबतच सांस्कृतिक महत्त्व अधिकच अधोरेखित झाले, असेही नगराध्यक्षांनी नमूद केले. यावेळी तरुणांना आवाहन करताना शेख रफिकभाई म्हणाले, “आजच्या तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून कुस्ती, कबड्डीसारख्या मैदानी खेळांकडे वळावे. या खेळांमुळे शारीरिक बळासोबत मानसिक कणखरपणाही निर्माण होतो.”


भविष्यात पार्श्वनाथ महादेव यात्रेतील कुस्ती स्पर्धा अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्यासाठी व कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष व यात्रा कमिटीचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांच्या उपस्थितीत वडगाव (ज) येथील सरपंच विशाल राठोड यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून सभापती जनार्दन ताडेवाड, संचालक दिलीप अनगुलवार, डॉ. रविभाऊ जाधव, सरपंच बापुराव बोड्डावार, सरपंच सुनील शिरडे, राजेश्वर अनगुलवार, नगरसेवक संभाजी मेंडके, भगवान मुदेवाड, दीपक कात्रे, कल्याणसिंह ठाकुर, रामराम निर्मले, खालिदभाई, दिनेश राठोड, गजानन विश्वनाथ बुरकुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांचा सत्कार करण्यात आला.

