हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) हिमायतनगर येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर प्रत्येक बुधवारी भरविण्यात येणारा आठवडी बाजार नागरिकांसह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात दुकाने, हातगाड्या व वाहतूक यामुळे अडथळे निर्माण होत असल्याने रुग्णालयात ये-जा करणे अत्यंत कठीण बनले आहे.


विशेषतः अति गंभीर रुग्णांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी आणताना बाजारातील गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे रुग्णांना योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळण्यात विलंब होतो, आणि त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

नागरिक व रुग्णांच्या नातेवाईकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून, “रुग्णालयासमोरील आठवडी बाजार तत्काळ इतर योग्य ठिकाणी हलविण्यात यावा,” अशी मागणी जिल्हा प्रशासन आणि नगरपंचायतकडे करण्यात येत आहे.



आरोग्यसेवेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या रुग्णालय परिसरात गर्दी, आवाज आणि वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त केले जात आहे. याबाबत अनेक नागरिकांचे म्हणणे आहे की, आठवडी बाजाराचे पूर्वीचे ठिकाण पुन्हा सुरू करावे.

रुग्णालय परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवावी. प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढावा. “जर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर जनतेला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.”
