उस्माननगर, माणिक भिसे| आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेत बारुळ येथील वाघमारे कुटुंबातील एकाच घरातील तिघा भावंडांनी घवघवीत यश संपादन करत सुवर्णपदक पटकावले आहे. या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरात कौतुक व अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.


सुमसांची सूर्यकांत वाघमारे, सम्यक संगपाल वाघमारे आणि स्नेहल सूर्यकांत वाघमारे या तिघा भावंडांनी इंग्रजी विषयातील प्रावीण्य सिद्ध करत गोल्ड मेडल मिळवले आहे. इंग्रजी भाषेतील आकलनशक्ती, व्याकरण, शब्दसंपदा, वाचनक्षमता आणि विचारशक्तीची कसोटी पाहणारी ही परीक्षा अत्यंत आव्हानात्मक मानली जाते. अशा स्पर्धेत यश संपादन करणे सोपे नसताना, वाघमारे भावंडांनी सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे सुवर्णयश मिळवले आहे.

विशेष म्हणजे, एकाच घरातील तिघा भावंडांना एकाच वेळी सुवर्णपदक मिळणे ही अत्यंत दुर्मिळ व प्रेरणादायी बाब ठरली असून, यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी नवी दिशा मिळाली आहे. त्यांच्या यशामागे पालकांचे मोलाचे मार्गदर्शन, शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि घरातील पोषक शैक्षणिक वातावरण महत्त्वाचे ठरल्याचे सांगण्यात येत आहे.


या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा प्रशासन, शिक्षकवृंद, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांकडून वाघमारे भावंडांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. “हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच आदर्श ठरेल,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

वाघमारे भावंडांचे हे सुवर्णयश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरले असून, भविष्यातही ते अशीच उज्वल कामगिरी करत यशाची नवी शिखरे गाठतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

