लोहा| राज्याचे तसेच माजी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा घेऊनही लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला मतदारांनी स्पष्ट नकार दिला असून सूर्यवंशी कुटुंबासह भाजपाचा स्थानिक राजकारणातील एकछत्री अंमल जनतेने मोडीत काढला आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार आणि विजयी १७ नगरसेवकांसह जवळपास हजारो कार्यकर्ते व शंभरहून अधिक वाहनांच्या ताफ्यासह शनिवारी (२७ डिसेंबर) सकाळी दहाच्या सुमारास नांदेडच्या वसंतनगर येथील “साई–सुभाष” वर दाखल झाले. यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर व कुटुंबीयांचा भव्य खारीक-खोबऱ्याच्या हारांनी सत्कार करून विजयाचा गुलाल व पुष्पवृष्टीचा वर्षाव करण्यात आला.


यंदाची लोहा नगरपालिकेची निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली. एकाच कुटुंबातील तब्बल सहा जणांना उमेदवारी देऊनही सर्वांचे पराभव झाल्याने भाजपाला मोठा राजकीय धक्का बसला. शेतकरी कुटुंबातील, जनमाणसांत मिसळणाऱ्या कार्यकर्त्यांवर मतदारांनी विश्वास ठेवत त्यांना विजयाचा कौल दिला.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार, १७ नगरसेवक, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, माणिकराव मुकदम, डॉ. लक्ष्मीकांत लव्हेकर, केशवराव मुकदम, करीम शेख, श्याम पाटील, अकबर मौलाना, संजय मक्तेदार आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी-कार्यकर्ते जल्लोषात वसंतनगर येथे पोहोचले आणि “साई–सुभाष” परिसरात गुलाल-पुष्पांची उधळण करत उत्साही स्वागत सोहळा पार पडला.


आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली मिळवलेला हा ऐतिहासिक विजय असल्याचे सांगत नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार व नगरसेवकांनी आमदार चिखलीकर, त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाताई चिखलीकर, युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, सचिन पाटील चिखलीकर तसेच पक्ष निरीक्षक माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांचा भव्य खोबऱ्याच्या हारांनी सत्कार केला.

लोह्यातील भाजपाची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी कसून मेहनत घेतल्याचे प्रतापराव चिखलीकर यांनी यावेळी सांगितले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक वचनबद्ध राहतील, तसेच शहरातील अनिष्ट प्रवृत्तींना आळा घालण्यावरही भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट करत शहरवासीयांचे आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

