नांदेड | नांदेड वाघाळा महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली असून, सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी करून आपापले नगरसेवक निवडून आणले आहेत. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत वडार समाजाला पुन्हा एकदा प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवण्यात आले, अशी खंत वडार समाजाचे जिल्हाध्यक्ष संभाजी अण्णा देवकर यांनी व्यक्त केली आहे.


नांदेड महानगरपालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासाकडे पाहिले असता, वडार समाजाला कोणत्याही पक्षाने थेट उमेदवारी देऊन सन्माननीय पद दिल्याचे उदाहरण नाही, असे देवकर यांनी सांगितले. नांदेड शहरात वडार समाजाची लोकसंख्या १५ हजारांहून अधिक असूनही, महापालिका निवडणुकीत समाजाला प्रतिनिधित्व न मिळणे ही अन्यायकारक बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देवकर यांनी नमूद केले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पाठीशी वडार समाज गेल्या अनेक वर्षांपासून खंबीरपणे उभा आहे. असे असतानाही समाजाच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रभाग क्रमांक ३ सांगवी बु. येथे ओबीसी प्रवर्गातून इंजि. आकाश काशिनाथ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आग्रहास्तव हा अर्ज मागे घेण्यात आला. या प्रभागात वडार समाजाचे १५०० पेक्षा अधिक मतदार असूनही समाजाला उमेदवारी नाकारण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.


तसेच, चिखलवाडी परिसरातूनही वडार समाजाकडून उमेदवारीची मागणी करण्यात आली होती. मात्र, तेथेही समाजाला संधी देण्यात आली नाही. इतर समाजांना विविध प्रभागांत मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व मिळत असताना वडार समाजावर सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप देवकर यांनी केला.

यामुळे, नांदेड वाघाळा महानगरपालिकेत वडार समाजातील योग्य, सुशिक्षित आणि सक्षम उमेदवाराची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करून समाजाला न्याय द्यावा, अशी कळकळीची मागणी जिल्हाध्यक्ष संभाजी अण्णा देवकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे. ही मागणी समस्त वडार समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

