हिमायतनगर, अनिल मादसवार| राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे वडगाव ज. भागात मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्याने दोन शेतीच्या आखाड्यावर आणि एक हॉटेलवर चोरी करून मोठा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात बुधवारी सकाळी वृत्त लिहीपर्यंत कोणतीही नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
हिमायतनगर शहरांसह तालुक्यातील ग्रामीण भागात चोरीचे सत्र सुरूच आहे. हिमायतनगर पोलीस चोरीच्या घटनाना आवर घालण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. असे असताना देखील चोऱ्याचे सत्र सुरूच असल्याने चोरटयांनी एक प्रकारे पोलिसांना पकडण्याचे आव्हानच दिले कि काय..? अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. हिमायतनगर शहरात घडलेल्या दोन चोरीचा पोलिसांनी पर्दाफाश करून चोरट्यांच्या मुचक्या आवळल्या होत्या. त्यानंतर मागील सहा महिण्यापुर्वीच्या दरोड्यातील फरार तीन आरोपीना पोलिसांनी जेरबंद करून आपली चुणूक दाखविली आहे.
त्यानंतर चोरट्यानी आपला मोर्चा आता एखादे आणि ग्रामीण भागाकडे वळविला असल्याचे दिसत आहे. मंगळवारच्या रात्रीला हिमायतनगर तालुक्यातील वडगाव ज परिसरात एकाच रात्रीला तीन ठिकाणी चोरी करून चोरट्यानी धुमाकूळ माजविला आहे. येथील शेतकरी नारायण कोरेवार यांच्या शेतातून पोलचा वायर, मोटारपंप आणि दुसरा शेतकरी राजू जाधव यांच्या शेतातील विहिरीची मोटारपंप आणि पोलचा केबल अज्ञात चोरट्यानी चोरून नेला आहे.
चोरट्यानी एव्हढ्यावर आपले बस्तान न गुंडाळता वडगाव ज.येथील मारोती मंदिराजवळच असलेल्या प्रकाश बेळगे यांचे हॉटेल फोडून खुर्च्या, गैस, टीव्ही, नगदी 2 हजार व चिल्लर रक्कम तसेच लाईटचे बल्ब, होम थेटर, यासह इतर सामान असे मिळवून अंदाजे 25 हजाराची चोरी केली आहे. एकूणच चोरट्यानी वडगाव ज. परिसरात एकच रात्रीत तीन ठिकाणी चोरी केल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरीच शोध पोलिसांना लावून शेतकरी नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.
हिमायतनगर तालुक्यातील वडगाव ज. परिसरातील शेतीच्या खांद्यावरून मोटारपंप व केबल चोरीला गेल्यामुळे महावितरणचे कनिष्ठ अभियंता कळसकर यांनी काल हिमायतनगर पोलीस ठाण्यात येऊन चोरीच्या घटनेची माहिती दिली. मात्र पोलीस ठाण्यात या संदर्भात कोणतीही नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. एकूणच मंगळवारी घडलेल्या चोरीच्या घटनेची चौकशी करून नोंद केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आल आहे.