पंढरपूर| आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने व प्रभावती बाबासाहेब माने या दाम्पत्यासमवेत श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता सर्वांचे योग्य पुनर्वसन करून येत्या अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.


वाढत्या भाविकसंख्येच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी पंढरपूर कॉरिडॉरची उभारणी करण्यात येणार आहे. कॉरिडॉरमुळे व्यावसायिकांचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल, नागरिकांना घरे उपलब्ध होतील आणि भाडेकरूंचीही योग्य व्यवस्था केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


यंदाच्या वारीत दर्शनासाठी २५ किलोमीटरपेक्षा अधिक लांब रांग लागली होती. लाखो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने विठ्ठलाचे दर्शन घेतले. चंद्रभागा नदीचे पाणी स्वच्छ ठेवण्यासह वाळवंट परिसरात स्वच्छता व भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.



शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, उद्योजक अशा सर्व घटकांचा वारकरी संप्रदायात समावेश आहे. वारकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा असल्याचे सांगत, शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी राज्य शासनाने ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी, मोफत वीज आणि थकीत वीजबिले माफ करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, सुरेश खाडे यांच्यासह जिल्हा प्रशासन व मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

