HomeमुंबईLatur Bus stand : लातूरच्या बसस्थानक व डेपो स्थलांतरणाचा प्रश्न तात्काळ मार्गी...

Latur Bus stand : लातूरच्या बसस्थानक व डेपो स्थलांतरणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा

लातूर| लातूर शहर शिक्षण, कृषी आणि व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले असून, शहरात दररोज ८०० ते ९०० बसची ये-जा असते. प्रवाशांची वाढती संख्या पाहता सध्याचे मध्यवर्ती बसस्थानक अपुरे पडत असून, त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पार्किंग व्यवस्थेसह सुसज्ज बसस्थानक उभारण्यात यावे, त्याचबरोबर लातूर येथून महत्त्वाच्या शहरासाठी अद्यावत इलेक्ट्रिक बस सुरू कराव्यात यासह विविध मागण्या राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रतापजी सरनाईक यांच्याकडे त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीदरम्यान केल्या आहेत. त्यांनी या सर्व मागण्यांना अनुकूलता दर्शवत संबंधितांना सूचना केल्या आहेत.

परिवहन विभागाच्या संदर्भाने लातूर शहर व जिल्ह्यातील विविध मागण्यांची निवेदने परिवहन मंत्री ना. प्रतापजी सरनाईक यांच्याकडे वेळोवेळी देण्यात आली आहेत, या सर्व निवेदनावर विचार करून निर्णय घेण्यासाठी त्यांनी आज बुधवार दि. ९ जुलै २५ रोजी त्यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते.

परिवहन मंत्र्यांच्या दालनात आढावा बैठक:
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर येथील परिवहन विभागाच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी झालेल्या बैठकीत आमदार देशमुख यांनी बसस्थानकाचे बी.ओ.टी. तत्त्वावर बहुमजली पार्किंग व्यवस्थेसह त्वरित नूतनीकरण करण्यात यावे, ज्याला यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे असे सांगीतले. तर एस.टी. डेपो स्थलांतर संदर्भात ते म्हणाले, लातूर शहराचा विस्तार झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक असलेला एस.टी. डेपो आता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आला आहे, ज्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एस.टी. डेपो अंबाजोगाई रोडवरील वर्कशॉप नजीक स्थलांतरित करावा आणि त्याठिकाणी असलेले बसस्थानक क्र. २ छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्थलांतरित करावे.

लातूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत जुनी झाली असून, तिच्या दुरुस्तीसाठी ७८ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्यात यावा. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एस.टी. डेपोतून बसचालकांना बसस्थानकाबाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा भाग असल्याने वाहन पार्किंगची मोठी अडचण आहे. अंबाजोगाई रोडवरील बसस्थानक क्र. २ मध्ये फक्त अंबाजोगाईकडे जाणाऱ्या बस थांबतात, ज्यामुळे प्रवाशांना शहरात ये-जा करणे गैरसोयीचे ठरते आणि या बसस्थानकातून प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळतो.

अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक:
लातूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक महामार्गांवर शेतमालाची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांची अडवणूक करून परिवहन अधिकारी पैशाची मागणी करतात, अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशीही मागणी यावेळी करुन लातूर जिल्ह्यात वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी २ हजार रुपये एका वाहनाला द्यावे लागतात. पैसे दिले नाहीत तर परिवहन अधिकारी त्रुटी काढतात, हा एक प्रकारे लाच घेण्याचा प्रकार आहे. अशा अधिकाऱ्यांवर देखील कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी सर्व मागण्यावर सवीस्तर चर्चा होवून या सर्व प्रश्नांची तातडीने सोडवणूक केली जाईल, अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments