लातूर| राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. या टास्क फोर्सकडून राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक सुधारणा सुचविण्यात येणार आहेत.


या अनुषंगाने टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना भेट देऊन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागासाठी २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


या संवादादरम्यान भरती परीक्षांमध्ये येणाऱ्या अडचणी, परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच परीक्षा अधिक पारदर्शक व विश्वासार्ह करण्याबाबत सूचना आणि अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या नागरिकांनी आपले लेखी अभिप्राय csn-examreformtaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.



१८ सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष – भरती परीक्षा सुधारणांसंदर्भातील सूचना व अभिप्राय संकलित करण्यासाठी मराठवाड्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. हे कक्ष १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहेत. नागरिकांनी आपल्या सूचना, अडचणी आणि अभिप्राय संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात प्रत्यक्ष सादर करावेत, असे प्रशासनाने कळविले आहे.
या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचनांचा टास्क फोर्स अभ्यास करणार असून, भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढविणे तसेच उमेदवाराभिमुख परीक्षा व्यवस्था निर्माण करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनाला शिफारशी सादर केल्या जाणार आहेत.

