नांदेड| पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची दुसरी यादी ११ सप्टेंबर रोजी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यातील सुमारे ३ लाख ५५ हजार शेतकऱ्यांचा या यादीत समावेश असून, नांदेड जिल्ह्यातील ३९ हजार २५५ शेतकरी पात्र ठरले आहेत.


या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेले, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेले आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेले पीक कर्ज तसेच पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे.


योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे केली जात आहे. महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर बँकांकडून कर्ज खात्यांची माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. संगणकीय प्रक्रियेनंतर पहिली यादी २४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीतील आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या १२ लाख ५८ हजार पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर एकूण १० हजार ११५ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.




