नांदेड| खरीप पणन हंगाम २०२६-२७ अंतर्गत धान, तांदूळ, ज्वारी, मका व अन्य तृणधान्यांच्या शासकीय खरेदीसाठी केंद्र शासनाच्या अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने एकसमान गुणवत्ता निकष निश्चित केले आहेत. या निकषांची पूर्तता करणारेच धान्य नांदेड जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्रांवर स्वीकारले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान्याची योग्य स्वच्छता करून ते पूर्णपणे वाळवूनच खरेदी केंद्रावर आणावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने केले आहे.


धानासाठी चांगला व्यापारी दर्जा, स्वच्छता, कोरडेपणा तसेच दाण्यांचा एकसमान रंग व आकार अपेक्षित आहे. धानामध्ये बुरशी, कीड, दुर्गंधी, अपायकारक पदार्थ तसेच मेक्सिकन पॉपी व खेसारी यांसारख्या अशुद्धी नसणे आवश्यक आहे. ग्रेड ‘अ’ धानासाठी दाण्यांचे लांबी-रुंदी गुणोत्तर २.५ किंवा त्यापेक्षा अधिक, तर सामान्य श्रेणीसाठी २.५ पेक्षा कमी असणे आवश्यक असून धानातील आर्द्रतेचे प्रमाण कमाल १७ टक्के असावे.


तांदळासाठी आर्द्रतेची स्वतंत्र मर्यादा – तांदळामध्ये आर्द्रतेचे प्रमाण १४ टक्क्यांपर्यंत असल्यास कोणतीही मूल्यकपात केली जाणार नाही. १४ ते १५ टक्के आर्द्रता असल्यास नियमानुसार मूल्यकपात करून खरेदी केली जाईल. मात्र, १५ टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता असलेला तांदूळ स्वीकारला जाणार नाही. तांदूळ स्वच्छ, कोरडा आणि मानवी वापरासाठी सुरक्षित असणे आवश्यक आहे.
ज्वारीसाठी आर्द्रतेची कमाल मर्यादा १३ टक्के, मक्यासाठी १४ टक्के, तर दुय्यम तृणधान्यांसाठी १३ टक्के निश्चित करण्यात आली आहे. परकीय पदार्थ, अन्य अन्नधान्य, खराब किंवा रंग बदललेले दाणे याबाबतही शासनाने निश्चित केलेल्या मर्यादांचे पालन करावे लागणार आहे. धान्याची गुणवत्ता तपासणी, नमुना घेणे आणि विश्लेषण भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) निर्धारित मानकांनुसार करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदीपूर्वी धान्याची स्वच्छता आणि योग्य वाळवणूक करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




