श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जनतेसमोर आणलेल्या ऑडिओ क्लिपनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या क्लिपमध्ये मराठा आंदोलन संपवण्यासाठी भाजपाकडून शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना ५०० कोटी रुपये दिल्याची चर्चा आहे. जरांगे पाटील यांचे म्हणणे आहे की, त्यांच्यापर्यंत हे पैसे आलेच नाहीत. मग हे ५०० कोटी आले कुठून, गेले कुठे आणि त्यांचे झाले काय? असा सवाल आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वसामान्य जनतेला पडला आहे.


महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्याकडून पैशांचा कसा खेळ सुरू आहे, याचा स्फोट जरांगे पाटील यांनी या क्लिपमधून केला आहे. एक आंदोलन संपवण्यासाठी सरकार ५०० कोटी रुपये देऊन थांबवण्याचा प्रयत्न करते, अशी चर्चा आता सर्वत्र सुरू आहे. या प्रकरणामुळे सत्ताधाऱ्यांची मोठी कोंडी झाली असून विरोधकांनीही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी लावून धरली आहे.


दुसरीकडे, दुष्काळात अडकलेल्या आणि कर्जाचा डोंगर छाताडावर असलेल्या बळीराजाला मात्र सरकारकडून केवळ ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली जात आहे. आंदोलन संपवायला ५०० कोटी आणि शेतकऱ्याच्या मदतीला ५ हजार, हा विरोधाभास कसा, असा संतप्त सवाल माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही तेवढ्याच गांभीर्याने पाहावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



राजकीय द्वेषाचे मेळावे गाजले, शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित !
दसरा मेळाव्यांमध्ये नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पाडला. सत्तेचा संघर्ष, द्वेषाची भाषा, एकमेकांना संपवण्याची चढाओढ – यालाच महत्व मिळाले. पण ज्या शेतकऱ्याच्या जीवावर हे नेते मोठे झाले, त्याच शेतकऱ्याच्या प्रश्नांवर एक शब्दही कुणी बोलला नाही.
दुष्काळाने गावं होरपळत आहेत. पाणी नाही, जनावरांना चारा नाही, पिकं करपली, कर्जाचा डोंगर वाढतोय. शेतमजूर, कष्टकरी उपाशीपोटी जगतोय. पण मेळाव्याच्या व्यासपीठावरून शेतकऱ्याच्या वेदनेचा एकही आवाज उठला नाही. नेत्यांना खुर्चीची चिंता आहे, शेतकऱ्याच्या चितेची नाही, असा संताप आता जनतेतून व्यक्त होत आहे.
जनता विचारतेय – मेळावा कुणासाठी होता? नेत्यांच्या अहंकारासाठी की जनतेच्या प्रश्नांसाठी? दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, पण इथे तर शेतकऱ्याच्या चांगल्या दिवसांवरच वाईट राजकारणाचा विजय झाला. राजकारणात द्वेष जिंकला आणि शेतकरी पुन्हा हरला.
