नांदेड, अनिल मादसवार| जिल्ह्यात खासगी सावकारीच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन खासगी सावकारांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) स्थापन करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य महानगरप्रमुख प्रकाश मारावार यांनी केली आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि जिल्हा उपनिबंधक यांचा समावेश असलेली संयुक्त यंत्रणा तयार करून सावकारीच्या व्यवहारांची सखोल चौकशी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.


शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीचा प्रश्न ऐरणीवर
खासगी सावकारांकडून अवाजवी व्याज, दंडात्मक रक्कम आणि चक्रवाढ व्याजाच्या नावाखाली कर्जदारांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. गरजेच्या वेळी घेतलेले अल्प रकमेचे कर्ज परतफेडीच्या वाढत्या बोजामुळे अनेक पटींनी वाढत असल्याचे आरोप केले जात आहेत. या व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करून बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मारावार यांनी केली.


शेतकरी हत्या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी
नांदेडमध्ये एका शेतकऱ्याचे अपहरण करून खासगी सावकाराच्या कार्यालयात हत्या करण्यात आल्याचा आणि त्यानंतर घटनेला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी प्रकाश मारावार यांनी केली आहे.



१० हजारांचे कर्ज ७० हजारांवर कसे?
केवळ १० हजार रुपये ३० टक्के व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेत न झाल्याने संबंधित शेतकऱ्यावर ७० हजार रुपये भरण्याची वेळ आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अल्प रकमेच्या कर्जावर व्याज, दंड आणि इतर आकारण्यांमुळे कर्जाचा बोजा अनेक पटींनी वाढत असेल, तर संबंधित व्यवहारांची कायदेशीर तपासणी होणे आवश्यक आहे.
“कर्जाच्या गरजेपोटी सावकाराकडे गेलेल्या शेतकऱ्याला मदतीऐवजी कर्जाच्या दुष्टचक्रात अडकवले जात असेल, तर ही गंभीर बाब आहे,” अशी भूमिका मारावार यांनी मांडली.
पीडितांनी पुढे येऊन तक्रार करावी
खासगी सावकारीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि नोकरदारांनी भीती न बाळगता जिल्हा प्रशासनाकडे किंवा ठाकरे सेनेच्या मदत कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकाश मारावार यांनी केले. खासगी सावकारीच्या मनमानीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत आणि पीडितांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
