हिमायतनगर, अनिल मादासवार| वाळकेवाडी येथील भोळ्याभाबड्या आदिवासी ग्रामस्थांची महावितरणकडून फॉल्टी मीटरच्या नावाखाली आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शंकर बर्डे यांनी केला आहे. गावातील जवळपास २५० वीज मीटर फॉल्टी असल्याचा दावा करत, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.


गावातील अनेक वीज ग्राहकांना त्यांच्या वीज वापराच्या तुलनेत अवाजवी बिले येत असल्याची ग्रामस्थांची तक्रार असल्याचे बर्डे यांनी म्हटले आहे. प्रत्येक घराच्या बिलात सरासरी महिन्याला १०० पेक्षा अधिक युनिटची नोंद होत असून, त्यामुळे हजारो रुपयांची बिले भरावी लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आदिवासी कुटुंबांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.


२५० मीटर फॉल्टी असल्याचा दावा; महावितरणने चौकशी करावी!
एका गावात एवढ्या मोठ्या संख्येने मीटर सदोष असल्याचा दावा केला जात असेल, तर महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. संबंधित मीटरची तांत्रिक तपासणी करावी, प्रत्यक्ष वीज वापर आणि बिलांची पडताळणी करावी, तसेच चुकीची बिले आढळल्यास ती दुरुस्त करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.



अन्यथा लोकशाही मार्गाने लक्षवेधी आंदोलन!
“आमचा आदिवासी समाज वर्षानुवर्षे या प्रकाराला सामोरे जात असल्याची तक्रार आहे. मात्र, अद्यापही कोणी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. महावितरणने तातडीने चौकशी करून ग्राहकांना न्याय द्यावा; अन्यथा लोकशाही मार्गाने लक्षवेधी आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही,” असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शंकर बर्डे यांनी दिला आहे.
आता महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वाळकेवाडीतील कथित सदोष मीटर प्रकरणाची चौकशी करून ग्रामस्थांना दिलासा देणार का? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
