देगलूर, गंगाधर मठवाले|आगामी काळात संभाव्य भीषण दुष्काळाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांच्या समस्या वेळीच जाणून घेऊन त्यांच्या गरजांनुसार उपाययोजना करण्याच्या उद्देशाने काँग्रेस नेते रामदास पाटील सुमठाणकर यांनी तमलूर गावाला भेट देत दुष्काळ व संवाद दौरा केला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत माहिती घेतली.


शहापूर–देगलूर–बिलोली विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात दुष्काळाची संभाव्य तीव्रता लक्षात घेता, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देणे आवश्यक असल्याचे या दौऱ्यातून अधोरेखित झाले. शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, आगामी काळातील पाणी नियोजन तसेच पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यासंदर्भात ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्या आणि सूचना रामदास पाटील सुमठाणकर यांनी जाणून घेतल्या.


दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकरी आणि ग्रामीण जनतेला अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आवश्यक बाबींचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. संभाव्य संकटाची पूर्वसूचना लक्षात घेऊन नियोजन करणे आणि शेतकऱ्यांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.



तमलूरेश्वर मठात घेतले महाराजांचे आशीर्वाद
दौऱ्यादरम्यान रामदास पाटील सुमठाणकर यांनी तमलूरेश्वर मठाचे मठाधिपती १०८ शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच शिवराज हाडे आणि श्रीनिवास काळोशे यांच्या आस्थापनांनाही भेट दिली.
यावेळी काँग्रेसचे देगलूर तालुकाध्यक्ष विष्णू पाटील शेखापुरकर, डॉ. पूजा गायकवाड, रामराव वाघमारे, अॅड. शिवानंद टेकवार, शिवलिंग मिसाळे, दयानंद वाघमारे, अर्जुन भालेवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
दुष्काळाच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेऊन शेतकरी व ग्रामस्थांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या दृष्टीने हा संवाद दौरा महत्त्वपूर्ण ठरला.
