हिमायतनगर (वाढोणा), अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी जनता आर्थिक संकटात सापडली असताना मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारी कथित सक्तीची कर्जवसुली तात्काळ थांबवावी, अशी आक्रमक मागणी तालुक्याचे भूमिपुत्र श्रीदत्त पाटील सोनारीकर यांनी केली आहे. कष्टकरी जनतेला विनाकारण त्रास देणे थांबवले नाही, तर तालुक्यात जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.


“आम्ही बेईमान नाही; कर्ज फेडण्याची आमची तयारी आहे!” असे स्पष्ट करत पाटील म्हणाले की, शेतकरी आणि शेतमजूर सध्या रोजगार व उत्पन्नाअभावी हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा लावणे आणि सक्तीची वसुली करणे कष्टकरी कुटुंबांसाठी मोठे संकट ठरत आहे. जेव्हा हाताला काम मिळेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल, तेव्हा कर्जाची रक्कम व्याजासह परत करण्याची तयारी आहे; मात्र तूर्तास वसुलीला स्थगिती देऊन दिलासा द्यावा.


मुख्यमंत्री फडणवीसांसह केंद्र सरकारकडे लक्ष घालण्याची मागणी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर प्रश्नात तातडीने लक्ष घालावे. तसेच केंद्राच्या अर्थ मंत्रालयाने आणि राज्य शासनाने संबंधित मायक्रो फायनान्स कंपन्यांना सक्तीच्या वसुलीबाबत योग्य निर्देश द्यावेत, अशी मागणी श्रीदत्त पाटील सोनारीकर यांनी केली आहे.



“आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही; पण कष्टकरी जनतेचा छळ सहनही केला जाणार नाही,” असा इशारा देत त्यांनी प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करण्याची गरज अधोरेखित केली.
आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना तात्पुरता दिलासा देणे, वसुलीच्या प्रक्रियेत नियमांचे पालन करणे आणि कर्जदारांशी सन्मानाने वागणे आवश्यक आहे. त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर आणि महिला बचतगटांशी संबंधित कर्जदारांच्या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने पाहून तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
सक्तीच्या वसुलीला आळा घालून कष्टकरी जनतेला दिलासा मिळणार का? आता राज्य शासन, प्रशासन आणि संबंधित वित्तीय कंपन्या यावर काय भूमिका घेतात, याकडे हिमायतनगर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
