शेतकरी चंद्रकांत शिंदे मृत्यू प्रकरणी कठोर कारवाईची मागणी; हत्येचे गुन्हे दाखल होणार!

आमदार श्रीजया चव्हाण यांची पीडित कुटुंबीयांसह पोलीस अधीक्षकांची भेट; मायक्रो फायनान्सच्या कर्जवसुलीवरही व्यक्त केली नाराजी

NNL Team
By NNL Team

नांदेड, प्रतिनिधी | माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आमदार श्रीजया चव्हाण यांनी केली आहे. शनिवारी त्यांनी पीडित कुटुंबीयांसह जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांची भेट घेऊन या प्रकरणात न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

या भेटीदरम्यान मृत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या आई सर्जाबाई शिंदे आणि मुलगी रूपाली यांनी पोलीस अधीक्षकांसमोर घडलेला घटनाक्रम मांडला. संबंधित आरोपींवर हत्येचे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली. हे प्रकरण गंभीर असून, कुटुंबीयांच्या मागणीनुसार कायदेशीर कारवाई करावी, अशी भूमिका आमदार श्रीजया चव्हाण यांनी मांडली.

हत्येचे गुन्हे दाखल होत असल्याची पोलिसांची माहिती

पीडित कुटुंबीयांची बाजू ऐकल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी या प्रकरणात हत्येचे गुन्हे दाखल होत असल्याची माहिती दिली. त्यामुळे या प्रकरणातील पुढील पोलीस तपास आणि कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुष्काळात कर्जवसुलीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून अशा प्रकारे कर्जवसुली करणे चुकीचे असल्याचे सांगत, अशा पद्धतींना वेळीच आळा घालण्याची मागणीही आमदार चव्हाण यांनी केली. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी आणि कर्जदारांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने गंभीरपणे लक्ष घालावे, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनीही शनिवारी दुपारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्याशी संपर्क साधून प्रकरणाची माहिती घेतली आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणात सत्य समोर येऊन पीडित कुटुंबीयांना न्याय मिळतो का, तसेच कर्जवसुलीच्या कथित प्रकारांवर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!