धाराशिव| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निष्क्रिय कारभार व जनहित विरोधी धोरणाचा विधानसभा निवडणुकीवर प्रतिकूल परिणाम होऊ नये म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून झारखंड व दिल्ली या राज्याच्या विधानसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रात एकाच वेळी तिन्ही राज्याच्या निवडणुका केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार निवडणूक आयोग जाहीर करील असे स्पष्टपणे दिसत असल्याचे मत समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपत असली तरी निवडणूक आयोगाला सहा महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागते तसेच झारखंड व दिल्ली या राज्याच्या कार्यकाळ पुढील वर्षी जानेवारी व फेब्रुवारी मध्ये संपत आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका या दोन राज्याचे अगोदर घेतल्या तर त्याचा प्रतिकूल परिणाम झारखंड व दिल्ली या राज्याच्या मतदानावर होईल.
त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून झारखंड व दिल्ली या राज्याबरोबर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक डिसेंबर मध्ये घेतली जाईल असे स्पष्टपणे दिसत आहे. जम्मू काश्मीर व हरियाणामध्ये महाराष्ट्राच्या अगोदर निवडणूक घेऊन केंद्र सरकार मतदारांचा कल काय आहे याची चाचपणी करत आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लांबणीवर टाकण्याची सर्व कारणे व सबबी निवडणुक आयोग केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसारच जनतेला सांगत आहे.
सुरक्षेचे दिलेलं कारण हास्यास्पद असून एकाच वेळी देशभर निवडणुका झाल्या तरी सुरक्षा पुरवण्याची यंत्रणा भारतात मजबूत आहे. त्यामुळे आता महायुतीच्या पोकळ घोषणा व महाआघाडीचा शिमगा जनतेला दोन-चार महिने ऐकून घ्यावाच लागेल असे दिसत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील तेव्हा समाजवादी पार्टी सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकतीने निवडणूक लढवणार असल्याची माहिती ॲड रेवण भोसले यांनी दिली आहे.