Himayatnagar railway station : हिमायतनगर रेल्वे स्थानकाचे रूपड बदललं… पण सुविधा विसरल्या? प्रवाशांच्या अडचणीत वाढ

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर रेल्वे स्थानकाचे नावीनीकरण विकास काम मोठ्या गाजावाजात झाले; मात्र प्रत्यक्षात स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी आजही जैसे थेच असल्याचे चित्र दिसत आहे. रेल्वे स्थानकांवरील अपुऱ्या सुविधा, अस्वच्छता, गर्दीमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि भाविक यांना दररोज असुविधांचा सामना करावा लागत असून, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आता संतापाचे कारण ठरत आहे.


स्थानकावर ना पुरेशी पाण्याची सोय आहे, ना सुरक्षिततेची ठोस व्यवस्था. आरपीएफ किंवा जीआरपीएफची स्वतंत्र चौकी नसल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. किनवट आणि मुदखेड येथील पोलीस चौक्या तब्बल ६० ते ८० किलोमीटर अंतरावर असल्याने आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळणे कठीण ठरत आहे.

भाविकांसाठी दर्शनस्थळी जाण्यासाठी मोफत बससेवेची व्यवस्था नसल्याने अनेकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. लेडीज व जेन्टससाठी स्वतंत्र व स्वच्छ शौचालयांची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. महिलांसाठी स्वतंत्र वेटिंग हॉल नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस असुरक्षिततेची भावना वाढत आहे.


कोरोना काळात बंद झालेली पार्सल सेवा अद्याप सुरू न झाल्याने स्थानिक व्यापाऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. काझीपेठ–मुंबई साप्ताहिक रेल्वे बंदच असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणी सहन कराव्या लागत आहेत. तसेच धनबाद रेल्वेला हिमायतनगरला थांबा देण्याची मागणीही सातत्याने होत आहे.

स्थानकावर सुरू असलेल्या विकासकामांबाबतही नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्लॅटफॉर्मवर वापरण्यात आलेले स्टील निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. जुन्या इमारतीवर थातूरमातूर प्लास्टर करून ‘काम झाल्याचा देखावा’ निर्माण करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
तिकीट खिडक्या अपुऱ्या असल्याने गाडी येताच प्रवाशांची मोठी गर्दी होत असून गोंधळाची स्थिती निर्माण होते. स्वच्छतेसाठी पुरेसे कर्मचारी नसल्याने स्थानकाची अवस्था विदारक झाली आहे. कँटीन चालकांनाही आवश्यक सोयी-सुविधा नसल्याची तक्रार आहे.

याशिवाय पार्किंग शेड, मालवाहू (गुड्स) ट्रॅक, स्थानक इमारतीचा विस्तार, स्वागत कमान व ओपन गार्डनमध्ये महादेव मूर्ती बसवून सुशोभीकरण अशा अनेक मागण्या प्रलंबित आहेत. मालवाहू ट्रॅक उपलब्ध झाल्यास हिमायतनगरची बाजारपेठ वेग घेईल, असा विश्वास व्यापारी वर्ग व्यक्त करत आहे.
“कोटीवधीतून विकास झाला, असा दिखावा नको; प्रवाशांना सुविधा हव्यात,” अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली असून, रेल्वे विभागाच्या महाप्रबंधकांनी तात्काळ हिमायतनगर रेल्वे स्थानकाकडे लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

सर्वात गंभीर आणि चिंताजनक बाब म्हणजे सुरू असलेल्या विकासकामांची गुणवत्ता. प्लॅटफॉर्मच्या कामात निकृष्ट दर्जाचे स्टील वापरले जात असल्याचे आरोप होत असताना, जुन्या स्थानक इमारतीवर केवळ थातूरमातूर प्लास्टर करून ‘काम पूर्ण’ झाल्याचा देखावा उभा केला जात आहे. हा विकास आहे की केवळ दिखावा?
विकास म्हणजे फक्त रंगरंगोटी नव्हे, तर प्रवाशांच्या जीवित सुरक्षिततेशी थेट संबंधित असलेल्या टिकाऊ, दर्जेदार आणि दीर्घकाळ उपयोगी सुविधा असतात. प्रशासनाला हा साधा पण मूलभूत अर्थ नेमका कधी उमगणार, असा सवाल उपस्थित होत आहे.



