हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातील केंद्रीय प्राथमिक शाळा व कन्या शाळेच्या परिसरात केर, घाण व कचरा टाकण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे शाळेचे शैक्षणिक वातावरण बिघडत असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी दिनांक १६ जानेवारी रोजी शिक्षण विभाग व संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रार सादर केली आहे.


अस्वच्छतेमुळे वाढतोय आजारांचा धोका
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, शाळेच्या आवारात व आजूबाजूच्या परिसरात काही व्यक्तींकडून घाण केर व कचरा टाकला जात आहे. त्यामुळे दुर्गंधी, डास-माशांचा प्रादुर्भाव वाढला असून, संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लहान विद्यार्थी या अस्वच्छतेचा थेट बळी ठरत असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शिक्षण प्रक्रियेवर परिणाम
शाळा परिसर स्वच्छ व सुरक्षित असणे गरजेचे असताना, सध्याच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत असून, शिक्षण प्रक्रियेवरही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांनी तक्रारीत स्पष्ट केले आहे. तात्काळ शाळेसमोरील केर, कचरा, घाण स्वच्छ केली नाहीं तर विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाहीं असा पवित्रा पालकांनी घेतला असल्याचे पालक गजानन मांगूळकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना सांगितले आहे.


दोषींवर कठोर कारवाईची मागणी
शाळा परिसरात कचरा व धान्य टाकण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी, दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात असे प्रकार घडू नयेत. यासाठी शाळा प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी ग्रामस्थ व पालकांनी केली आहे. या प्रकरणाकडे शिक्षण विभाग व स्थानिक नगरपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी त्वरित निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


