श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। माहूर तालुक्यातील टाकळी येथील दोन घरांना शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास आकस्मिकपणे भिषण आग लागून एकमेकांना शेजारी असलेल्या दोन सख्ख्या चुलत भावांची घरे आगीत जळून खाक झाली.यात श्रीराम यांचे जवळपास अडीच लाखांचे नुकसान झाले तर लक्ष्मण यांचे ३० हजारांचे नुकसान झाले आहे. गावकऱ्यांनी दाखविलेल्या प्रसांगवधानामुळे मोठा अनर्थ टळला.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच माहूर तहसीलदार डॉ.राजकुमार राठोड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन नुकसानीची पाहणी करून मुरली – टाकळी सज्जाचे तलाठी गावंडे यांना त्वरित नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले. आपत्तीग्रस्तांना शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून उचित नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्यांचे मनोधैर्य वाढवत सांत्वन केले.
तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ राहणारे ६० वर्षीय श्रीराम किसन शेंद्रे हे दुसऱ्याची शेती बटाईने कसत आपल्या संसाराचा गाडा हाकत पत्नी व चार मुले अशा सहा जणांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करतित. त्यांच्या घराला शनिवार दि. १४ डिसेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास आकस्मिकपणे भिषण आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्यासह, शेतातील वेचणी करून घरात साठवून ठेवलेला १० क्विंटल कापूस, घरातील १ लाख रुपये रोख रक्कम, लाकडी शेती साहित्य ,लाकुडफाटा, कपडे, लाकडी दिवान, अन्नधान्य आगीत जळून खाक झाले.तर गोठ्यातील ६ बकऱ्या व त्यांचे ४ पिल्ले,१० कोंबड्या हे पशुधन देखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने होरपळून मृत्यूमुखी पडली. या दूर्दैवी घटनेत श्रीराम शेंद्रे यांचे जवळपास अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले.
तर लागलेल्या ह्या आगीने श्रीराम शेंद्रे यांचे घराशेजारी राहणाऱ्या लक्षमण शामराव शेंद्रे यांच्या घराला देखील आपले भक्ष्यस्थानी केल्याने त्यांच्या गोठ्यात ठेवलेले स्प्रिंकलर सेटचे प्लॅस्टिकचे ३० पाईप जळून खाक झाले तर बांधून असलेल्या बैलजोडी पैकी एक बैल भाजल्याने जबर जखमी झाला.यात लक्ष्मण यांचे जवळपास ३० हजारांचे नुकसान झाले आहे.ही भयंकर घटना शेजारच्या काही जागरुक लोकांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रसांगवधान दाखवल्यामुळे घरात झोपलेल्या दोघां महिलांना त्यांनी सुखरूपपणे जळत्या घरातून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
राज्यात नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या गरमागरम चर्चेचा पारा अद्यापही जरी चढलेलाच असला तरी वातावरणातील उष्णतेचा पारा मात्र कमालीचा खाली घसरला असल्याने प्रचंड हुडहुडी भरवणाऱ्या कडाक्याच्या थंडीपासून उब मिळवण्यासाठी प्रामुख्याने ग्रामीण भागात घराघरात,चौकात शेकोट्या पेटवलेल्या असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
टाकळी येथील आगीच्या दूर्दैवी घटनेत देखील अंगावर शहारे आणणाऱ्या कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी सदरील घरच्या लोकांनी घटनेच्या रात्री शेकटी पेटवली होती व नंतर ती झोपण्यापूर्वी विझविली देखील होती.परंतु, कदाचित ती अर्धवट विझल्याने वाऱ्यामुळे तीचा पुन्हा भडका होऊन त्याची ठिणगी श्रीराम शेंद्रे यांच्या टिन पत्रे व गवत ताटवे असलेल्या घरावर उडून सदरील आगीची घटना घडली असावी अशी शक्यता घटनास्थळी उपस्थित गावकऱ्यांनी व्यक्त केली असून, याकामी पंचनामा करणारे तलाठी गावंडे यांनीदेखील या शक्यतेला दुजोरा दिला.
आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने दोन घरे व त्यातील संसारोपयोगी साहित्य,रोख रक्कम, कापूस जळून खाक झाले तर पशुधनाचेही मोठे नुकसान झाले.पिडित श्रीराम शेंद्रे व लक्ष्मण शेंद्रे या दोन्ही भावांच्या कुटुंबाला आमदार भीमराव केराम यांच्यामार्फत शासनाकडून उचित नुकसान भरपाई मिळवून देणार. -विनायक राजू मुसळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष, माहूर