देगलूर/नांदेड| चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे देगलूर आगाराची औरादकडे जाणारी बस रस्त्याखालच्या दरीत गेल्याने 28 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 4 प्रवाशांची प्रकृती गंभीर असून, त्यांना तातडीने नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी देगलूर तालुक्यातील गवंडगाव-बल्लूर मार्गावर झाला.


सततच्या मुसळधार पावसामुळे या भागात रस्ते व पूल धोकादायक झाले आहेत. मौजे लोणी येथील निजामकालीन फुलाच्या गाळ्याची भिंत कोसळल्याने देगलूर-औराद मुख्य मार्ग मागील सहा दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे देगलूर आगाराच्या बस सेवा मागील तीन दिवसांपासून गवंडगाव–माळेगाव–हनेगाव–औराद या पर्यायी अरुंद मार्गावरून सुरू होत्या.



मुख्य मुद्दे :
अपघातात 28 प्रवासी जखमी
4 प्रवाशांची प्रकृती गंभीर
बस अरुंद व चिखलमय मार्गावरून जात असताना नियंत्रण सुटले
जखमींवर देगलूर व नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू
प्रशासनाने या मार्गावरील वाहतुकीसंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

