नांदेड/देगलूर (गोविंद मुंडकर) राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभा — तिन्ही स्तरांवर लोकप्रतिनिधी असलेला देगलूर मतदारसंघ… पण शिक्षणाच्या मंदिराची अवस्था पाहून कोणालाही लाज वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली जिल्हा परिषद हायस्कूल, देगलूर, आज शिक्षणाचं केंद्र नसून अस्वच्छतेचं आणि दुर्गंधीचं केंद्र बनली आहे.

शाळेच्या बाहेरील भिंतींवर लघवी, आजूबाजूला कचऱ्याचे ढीग, आणि वर्गांच्या परिसरात पसरलेली दुर्गंधी — अशा परिस्थितीत शेकडो विद्यार्थी रोज शिक्षण घेत आहेत. शाळेच्या भिंतींना सार्वजनिक शौचालयाचे स्वरूप प्राप्त झाले असून, दररोज १०० ते २०० नागरिक शिक्षणासाठी नव्हे तर लघवीसाठी या शाळेत येतात, ही अतिशय संतापजनक बाब आहे.


ही शाळा त्या भागातील आहे जिथे राज्यसभेत अशोक चव्हाण आणि अजित गोपछडे, लोकसभेत रवींद्र चव्हाण, आणि विधानसभेत जितेश अंतापुरकर हे प्रतिनिधित्व करतात. तरीदेखील, शाळेच्या परिसरातील ही दयनीय अवस्था पाहून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणाचा स्पष्ट प्रत्यय येतो.

शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अनेक वेळा ही समस्या स्थानिक प्रशासनास कळवूनही नगरपरिषदेचे दुर्लक्ष कायम आहे. स्वच्छता मोहिमा फक्त पोस्टरवर आणि भाषणात दिसतात; प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांना दुर्गंधी, माशा आणि अस्वच्छतेमध्ये बसून शिक्षण घ्यावे लागत आहे.

त्यामुळे पुढील प्रश्न उपस्थित होत असून ईतके लोकप्रतिनिधी असतानाही एका शाळेची अशी दुर्दशा का? प्रशासक राज आणि नगरपरिषदेचे अधिकारी जबाबदार नाहीत का? विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि भविष्यातील विकासाचा विचार कोण करणार?
आता निवडणुकीच्या तोंडावर सगळेजण विकासाच्या घोषणा करत असले तरी वास्तव वेगळंच चित्र सांगतंय. मत विकासाने नव्हे, तर पैसा आणि प्रलोभनांनी मिळतात, म्हणूनच शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता या मूलभूत गरजांकडे कुणाचं लक्ष नाही. देगलूर हायस्कूलची ही अवस्था केवळ एका शाळेची कथा नाही, तर संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचं जिवंत चित्र आहे.

