हिमायतनगर, अनिल मादसवार| कष्ट, जिद्द आणि देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून राबराब राबणाऱ्या घिसडी समाजातील युवकाने थेट सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) भरती होण्याचा मान मिळवला आहे. हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु. येथील घिसडी समाजातील चेल्लार कुटुंबाचा सुपुत्र बीएसएफमध्ये निवड झाल्यानंतर बेंगळुरू येथे कठोर प्रशिक्षण पूर्ण करून आता आपल्या गावाकडे परतत आहे.


या अभिमानास्पद यशानिमित्त दि. १९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पोटा बु. येथे गावकऱ्यांच्या वतीने भव्य जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेतमजुरी व कष्टाची कामे करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातून आलेल्या या युवकाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारल्याने केवळ चेल्लार कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण गाव व परिसरासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

“आपल्या समाजातील मुलगा देशसेवेसाठी उभा राहिला,” या भावनेतून गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या सत्कार सोहळ्यास खासदार नागेश पाटील आष्टिकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, माजी खासदार सुभाषराव वानखेडे, नगराध्यक्ष शेख रफिकभाई, नगराध्यक्ष भगवान दंडवे, गटविकास अधिकारी पी. पी. नारवटकर, तहसीलदार पल्लवीताई टेमकर, पोलीस निरीक्षक अमोल भगत, तसेच सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, सर्व पक्षांचे तालुकाध्यक्ष, तालुका प्रमुख व विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.


या कार्यक्रमात नवोदित बीएसएफ जवानाचा शाल, श्रीफळ व पुष्पहाराने सत्कार करण्यात येणार असून, मोठ्या संख्येने गावकरी, युवक मंडळे व समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. हा सत्कार सोहळा परिसरातील तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी, असे आवाहन शिवाजी चेल्लार, गंगाधर चेल्लार, अमृत चेल्लार यांच्यासह समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. देशसेवेच्या वाटेवर पाऊल ठेवणाऱ्या या जवानाच्या स्वागतासाठी पोटा बु. गाव सज्ज झाले असून, हा क्षण गावाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल, अशी भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

