नांदेड| नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली असून पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. तसेच जनावरांसाठी चारा, औषधे आणि निवार्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.


या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदन देण्यात आले. या निवेदनात पंचनाम्याची प्रतीक्षा न करता प्रति शेतकरी ५० हजार रुपयांची तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांनी सांगितले की, “स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड ही नेहमीच शेतकरी, सर्वसामान्य आणि जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढत आली आहे. शासनाने तातडीने मदत न दिल्यास संघटना आंदोलनाचा मार्ग अवलंबेल,” असा इशाराही त्यांनी दिला.


या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली.




