नांदेडसोशल वर्क

Ganjgaon ; गंजगाव ग्रामपंचायतीकडून प्रवासी बस सुरू करण्याची मागणी

बिलोली l गंजगाव ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन सार्वजनिक प्रवासी बस सुरू करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत कार्यालय, गंजगाव येथून पाठविण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गंजगाव हे गाव तालुका व जिल्हा मुख्यालयापासून दूर अंतरावर तेलंगाना सीमा भागात असूनही येथे नियमित एस.टी. बस सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, शेतकऱ्यांना बाजारपेठेत जाण्यासाठी, तसेच सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामांसाठी आणि आरोग्यसेवेसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, गंगाजाव हे गाव कुंडलवाडी मार्गावर वसलेले असून परिसरातील अनेक गावे या मार्गावर अवलंबून आहेत. मात्र, बससेवा नसल्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते. त्यासाठी जास्त भाडे मोजावे लागते तसेच वेळेचीही मोठी नासाडी होते. विशेषतः शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचणे कठीण होते. अनेक वेळा विद्यार्थ्यांना उशीर होतो , शिक्षणावरही परिणाम होतो.

आरोग्याच्या दृष्टीनेही ही समस्या गंभीर आहे. आजारी रुग्णांना तातडीने दवाखान्यात नेण्यासाठी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे अडचणी निर्माण होतात. महिलांनाही सुरक्षित आणि स्वस्त प्रवासाची सोय नसल्यामुळे त्रास सहन करावा लागतो.

ग्रामपंचायतीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, गंजगाव येथे एस.टी. बससेवा सुरू झाल्यास केवळ गंजगाव नव्हे तर कारला बुद्रुक परिसरातील इतर गावांनाही त्याचा मोठा फायदा होईल. शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठेत नेणे सोपे होईल, विद्यार्थ्यांचे शिक्षण नियमित होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांपर्यंत पोहोचणे सुलभ होईल.

या निवेदनावर गंजगावच्या सरपंच सौ. सुनीता हणमंतराव कानशेटे यांच्या स्वाक्षरीचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. परिवहन महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक अनघा बारटक्के यांच्याकडे लवकरच एक शिष्टमंडळ भेटणार असल्याचे सांगण्यात आले.

ग्रामपंचायतीने विभागीय नियंत्रकांकडे विनंती केली आहे की, गंजगाव मार्गावर लवकरात लवकर प्रवासी बस सुरू करून गावकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात. गावकऱ्यांमध्ये या मागणीबाबत आशावादी वातावरण असून, लवकरच सकारात्मक निर्णय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सीमा भागातील लघुळ या गावात विद्यमान आमदार जितेश अंतापुरकर यांच्या प्रयत्नाने बस सुरू झाली. येसगी,कारला ,गंजगाव, कुंडलवाडी मार्गे बिलोली हे बस तातडीने सुरू करावी अशी मागणी आता जोरदार आहे.

एकूणच, गंजगाव ग्रामपंचायतीने नागरिकांच्या मूलभूत सोयीसाठी केलेली ही मागणी महत्त्वपूर्ण मानली जात असून, प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button