Flood victims, don’t panic : पूरग्रस्तांनो घाबरू नका, मी तुमच्यासोबत आहे – माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर
हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आणि इसापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पैनगंगा नदीकाठची शेती पूर्णपणे जलमय झाली आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन, हळद यांसारखी पिके पाण्याखाली जाऊन शेतकरी हतबल झाले आहेत. या संकटात प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केली.
ते हिमायतनगर तालुक्यातील कोठा, कोठा तांडा, एकंबा आदी पूरग्रस्त भागांचा दौरा करून नुकसानीची पाहणी केल्यानंतर बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी पूरग्रस्त शेतकऱ्यांनी डोळ्यांत अश्रू ठेवून आपली हकिगत मांडली. “गेल्या काही दिवसांपासून सततचा पाऊस आणि पुरामुळे सगळं काही वाहून गेलं. आता उरलं त्यावर कसं जगायचं?” असा आर्त प्रश्न शेतकऱ्यांनी केला.
...


