नांदेड| जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारे “सहज सुचलं म्हणून” या नाटकाने, ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. परभणीच्या क्रांती हुतात्मा चारिटेबल ट्रस्टने सादर केलेल्या या नाटकात, आस्तिक-नास्तिक विचारसरणींच्या वादातून उलगडणाऱ्या जीवनाच्या गूढ शक्तीवर भाष्य करण्यात आले आहे. रविवारी (ता.१) हे नाटक कुसुम सभागृह नांदेड येथे पार पडले.
रविशंकर झिंगरे लिखित आणि मनीषा मधुकर उमरीकर दिग्दर्शित या नाटकाची विशेषता म्हणजे दोन मित्रांच्या संवादातून उभा राहणारा तात्त्विक प्रवास. जीवनातील देवाच्या अस्तित्वाबाबतची चर्चा आणि या संकल्पनेला मूर्तरूप देण्याचा प्रयत्न प्रेक्षकांना अंतर्मुख करतो.
सुनिलची भूमिका अनिकेत शेंडे यांनी साकारली असून, आकाश जव्हार यांनी अनिलची भूमिका निभावली आहे. श्रीपाद राजूरकर (चहावाला) आणि अमोल गोरकट्टे (देव) यांनीही आपापल्या भूमिकांमध्ये जीव ओतला आहे.मधुकर उमरीकर व संदीप राठोड यांनी नेपथ्य तर सिद्धांत उमरीकर आणि सुदीप खळीकर यांनी प्रकाशयोजनाचे उत्तम नियोजन केले आहे.
भूषण गाडेकर व प्रणव कुलकर्णी यांनी संगीत दिले असून गीतकार मुकुल शिंगाडे यांनी लिहिलेली गीते अवधूत गांधी यांच्या आवाजात सादर करण्यात आली आहेत.सुनील ढाकणे व अल्का पांडे यांनी रंगभूषेची जबाबदारी सांभाळली आहे. अनिल मुळजकर, योगेश पांडे आणि यश उमरीकर यांनी रंगमंच व्यवस्था हाताळली आहे.प्रेक्षकांनी या नाटकाला भरभरून दाद दिली.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे सुरु असलेली ही मराठी राज्य नाट्य स्पर्धा स्पर्धा अप्पर मुख्य सचिव श्री.विकास खारगे, संचालक विभीषण चवरे, सह-संचालक श्रीराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून या स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभागाचे समन्वयक म्हणून किरण चौधरी आणि त्यांची टीम परिश्रम घेत आहेत.