नांदेड| आजच्या स्पर्धेच्या युगात पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम भरती प्रक्रिया राबविणे ही प्रत्येक प्रशासनाची गरज बनली आहे. याच उद्देशाने विविध ८६ पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या परीक्षेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.


डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपूरी, नांदेड येथे वर्ग-४ मधील विविध ८६ रिक्त पदांच्या भरतीसाठी २५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. या भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील विविध भागांतून १७,१४६ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते, त्यापैकी ११,८६८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षेत सहभाग घेतला. परीक्षेसाठी मुंबई, पुणे, संभाजीनगर, नागपूर, अमरावती, नांदेड या प्रमुख शहरांतील एकूण ११ परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली होती.


परीक्षेचे आयोजन अत्यंत पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. प्रत्येक परीक्षा केंद्रावर जामर यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे व निरीक्षक नेमण्यात आले होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न होता परीक्षा शांततेत पार पडली. या भरती प्रक्रियेतील पुढील टप्प्यांबाबत व परीक्षेचा निकाल महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. बी. देशमुख यांनी दिली.


भरती प्रक्रियेसाठी सर्व परीक्षा केंद्रांवर योग्य त्या सुविधा, सीसीटीव्ही निगराणी, बायोमेट्रिक ओळख, तसेच तांत्रिक सहाय्यकांची उपस्थिती सुनिश्चित करण्यात आली होती. या ऑनलाईन परीक्षेच्या यशस्वी आयोजनामुळे उमेदवारांत समाधानाची भावना निर्माण झाली आहे.



