Wednesday, May 13

Tehsildar Surekha Nande : हदगाव तालुक्यातील शिवार व पांदण रस्ते मोकळे करण्यास यश

हदगाव, शेख चांदपाशा| शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या गाडी रस्ते, शिवार व पांदण रस्त्यांच्या मोकळ्या करण्याच्या कामाला हदगाव तालुक्यात गती मिळाली असून, महसूल विभाग आणि राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत हे कार्य प्रभावीपणे पार पाडले जात आहे.

हदगाव तालुक्याच्या तहसीलदार तथा दंडाधिकारी सुरेखा नांदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील २५ गाडी रस्त्यांपैकी १५ रस्ते मोकळे करण्यात आले असून, अनेक वर्षांपासून रखडलेले शिवार आणि पांदण रस्तेही खुले करण्यात आले आहेत. पादण रस्त्यांबाबत आलेल्या १४२ अर्जांपैकी ७६ अर्ज निकाली काढण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

या कामासाठी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांची विशेष टीम स्थापन करण्यात आली आहे. तहसीलदार नांदे यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य असल्याचे सांगितले. केंद्र शासनाच्या ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ योजनेचा हदगाव तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, या योजनेतून शेतकऱ्यांच्या जमिनींचे भू-संदर्भित नोंदी, पीक उत्पादन, बाजारपेठेतील संधी, आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित माहिती एकत्रित केली जात आहे.

शेतकऱ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या जमीन व पिकांच्या नोंदींशी जोडून ‘शेतकरी ओळख क्रमांक’ म्हणजेच ‘फार्मर आयडी’ तयार केला जात आहे. ही ओळख शेतकऱ्यांना शासकीय अनुदान, पीक विमा, प्रशिक्षण, आणि आधुनिक शेती संसाधनांसाठी आवश्यक ठरणार आहे.ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ पोर्टलवर नोंदणी करून ग्रामकृषी विकास समिती व क्षेत्रीय यंत्रणांची मदत घ्यावी, असे आवाहनही तहसीलदार सुरेखा नांदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!