नांदेड| वाडी पुयड गावात अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र व भगवा ध्वज अत्यंत श्रद्धेने आणि स्वाभिमानाने स्थापण्यात आलेला आहे. हा ध्वज गावकऱ्यांच्या अस्मितेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतीक आहे. मात्र, दिनांक 15/02/2025 रोजी रात्रीच्या अंधारात प्रशासनाने पोलिस बळाचा गैरवापर करून हा ध्वज हटवण्याचा प्रयत्न केला आणि महाराजांच्या तैलचित्राचा अवमान केला, ही बाब अत्यंत निंदनीय आणि असह्य आहे.


या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, हा प्रकार केवळ भगव्या ध्वजाचा अपमान नाही, तर संपूर्ण हिंदवी स्वराज्याच्या अस्मितेवर घाला घालण्याचा एक कटकारस्थानपूर्वक प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या आणि हिंदवी स्वराज्याच्या अस्मितेचे प्रतीक असून, त्यांच्या अपमानाचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करत जिल्हाधिकारी नांदेड याना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या कृत्यात सहभागी असलेल्या ग्रामसेवक, प्रशासनातील अधिकारी आणि व ग्रामसेवकास तात्काळ निलंबित करण्यात यावे. गावकऱ्यांना विश्वासात न घेता प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतला आहे, यामुळे भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी शासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी वाडी पुयड गावात गायरान जागा अधिकृतरित्या मंजूर करण्यात यावी.

गायरान जमिनीत अनधिकृत प्लॉटिंग करणारे आणि त्यासाठी जबाबदार असलेले तत्कालीन ग्रामसेवक यांची सखोल चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. वरील मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रातील शिवभक्त आणि स्वाभिमानी जनता या अन्यायाविरोधात निर्णायक लढा उभारल्याशिवाय राहणार नाही. अश्या मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक, नांदेड, तहसीलदार, नांदेड याना देण्यात आले आहे.
