नांदेड| देशभरात अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणारी श्री गुरु गोबिंदसिंघजी अखिल भारतीय गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धा शनिवार, दि. 20 डिसेंबर रोजी नांदेड येथे सुरू होत आहे. गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, गुरुद्वारा लंगर साहेबचे मुखी संतबाबा नरिंदरसिंघजी करसेवावाले, मुखी संतबाबा बलविंदरसिंघजी करसेवावाले तसेच गुरुद्वारा माता साहेबचे जत्थेदार संतबाबा तेजासिंघजी यांच्या पावन उपस्थितीत आंतरराष्ट्रीय हॉकीपटू सरदार जर्मनप्रीतसिंघ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती शिरोमणि दुष्टदमन क्रीडा युवक मंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक सरदार गुरमीतसिंघ (डिंपल) नवाब यांनी दिली.


नांदेड शहरात गेल्या ५२ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या स्पर्धेला दि. 20 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता प्रारंभ होणार असून दि. 27 डिसेंबर, श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराजांच्या प्रकाशपर्वाच्या दिवशी स्पर्धेचा समारोप होईल. गुरुजींच्या पावन प्रतिमेला व त्यांच्या महान योगदानाला समर्पित असलेल्या या राष्ट्रीयस्तरीय स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होत आहेत. हॉकी इंडियाच्या मान्यतेने यंदा स्पर्धेचे ५२ वे वर्ष साजरे होत आहे.

या स्पर्धेमुळे राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीला मोठे प्रोत्साहन मिळत असून नांदेडच्या भूमीवरून नवे, गुणवत्तापूर्ण खेळाडू घडविण्यात ही स्पर्धा मोलाची भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी नमूद केले. देशभरातून येणाऱ्या संघांसाठी निवास व भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली असून, सामने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंच व तांत्रिक पंचांच्या देखरेखीखाली पार पडणार आहेत.


यंदा स्पर्धेत बीएसएफ जालंधर, पंजाब पोलीस, एसजीपीसी पंजाब, आर्मी इलेवन जालंधर, ए.जी. दिल्ली, आय.टी. दिल्ली, ए.जी. नागपूर, बिलासपूर रेल्वे, ऑरेंज सिटी नागपूर, एमपीटी मुंबई, युनियन बँक मुंबई, सैफई इटावा, ए.जी. हैदराबाद, कर्नाटक हॉकी यांसह नांदेडचे युथ खालसा क्लब व चार साहिबजादे हॉकी अकादमी हे संघ सहभागी होणार आहेत. सर्व सामने खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम, नांदेड येथे खेळविण्यात येणार आहेत.

भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार व ऑलिम्पियन सरदार जर्मनप्रीतसिंघ यांच्या उपस्थिती व मार्गदर्शनामुळे खेळाडूंमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला आहे. या स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सरदार गुरमीतसिंघ नवाब व हॉकी कमिटीच्या सर्व सदस्यांनी केले आहे.

